नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने तत्परता आणि सतर्कता दाखवत सदर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणाचा अवघ्या 24 तासांत छडा लावला. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही घटना 19 मे 2026 रोजी दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास व्हीसीए चौक परिसरातील सेंट उर्सुला स्कूलसमोर असलेल्या प्रदीप नर्सरी येथे घडली. पीडित महिला नर्सरीमध्ये रोपांची विक्री करत असताना आरोपी ग्राहक बनून तेथे आला. संधी साधत त्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.
दरम्यान, पळताना आरोपी दुचाकीसह खाली पडला होता. मात्र, त्यानंतरही तो घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 240/2026 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने समांतर तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि सायबर टीमच्या मदतीने पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख रोहित नेमाजी मारबते (वय 25), रा. भवानीनगर, अवचट हनुमान मंदिराजवळ, पारडी नागपूर अशी झाली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची युनिकॉन मोटारसायकल (MH 49 BT 3924) किंमत अंदाजे 70 हजार रुपये, तसेच विवो कंपनीचा 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त केला. एकूण 2 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत सायबर टीमचे विशेष सहकार्य लाभले.
सोनसाखळी चोरी विरोधी पथकाच्या या जलद कारवाईचे शहरभरातून कौतुक होत आहे.









