Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, May 8th, 2018

  नंदनवन परिसरात सिलिंग फॅन पडून २ महिन्यांच्या बालिकेचा करुण अंत

  नागपूर: केवळ २ महिने वयाच्या निद्रिस्त बालिकेच्या अंगावर सिलिंग फॅन पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना नंदनवन परिसरात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे आसपासच्या भागात शोककळा पसरली आहे.

  गणेश वाडेकर हे खरबीतील डायमंडनगरात राहतात. ते एका ट्रान्सपोर्ट कार्यालयात काम करतात. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीने एका गोंडस कन्येला जन्म दिला. वाडेकर कुटुंबीयांनी तिचे नाव नेत्रा ठेवले. आईच्या कुशीतच तिचे जग. नेत्राची आईदेखील तिला जिवापाड जपायचा प्रयत्न करायची. घरातील आवश्यक कामे करून ती नेत्राला सारखी कुशीतच घेऊन राहायची. सोमवारी असेच झाले. सायंकाळी ५.१५ च्या सुमारास नेत्रा निद्रीस्त असल्याने तिला बिछान्यावर ठेवून तिची आई दैनंदिन कामात व्यस्त झाली. अचानक काही तरी पडल्याचा आणि त्याबरोबरच चिमुकल्या नेत्राच्या रडण्याचा आईला आवाज आला. ती धावतच घरात आली. नेत्राच्या अंगावर सिलींग फॅन पडला होता. आईने कसा बसा तो बाजूला फेकून नेत्राला छातीशी कवटाळले. ती निपचित झाली होती.

  धावपळ सुरू झाली. गणेश वाडेकर आले. त्यांनी नेत्राला प्रारंभी बाजूच्या डॉक्टरकडे नेले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी नेत्राला बालकांच्या इस्पितळात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, वाडेकर दाम्पत्य आणि त्यांच्या स्वकियांनी नेत्राला चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. चिमुकलीचा असा आकस्मिक मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145