Published On : Thu, Aug 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात दारूसाठी पैसे मागण्यावरून वाद; लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

Advertisement

नागपुरात दारूसाठी पैसे मागण्यावरून वाद; लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचझोपडा, मिनीमाता नगर परिसरात दारूसाठी पैसे मागण्यावरून झालेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी समीर चिंताराम बांते (१९) याला अटक केली आहे. मृताची ओळख मोहन चिंताराम बांते (२१) अशी आहे.

ही घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास प्लॉट क्रमांक २२३, गल्ली क्रमांक १६, मिनीमाता नगर येथे घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, मोहनला दारूचे व्यसन होते. तो दारू पिण्यासाठी वारंवार आई-वडिलांकडे पैशांची मागणी करत असे. पैसे न मिळाल्यास तो घरात वाद घालत शिवीगाळ करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेच्या दिवशी मोहनची आई सायंकाळी कामावरून घरी परतली. त्यावेळी मोहन दारूच्या नशेत होता. त्याने आईकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने घरातील सामान बाहेर फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने लहान भाऊ समीरलाही शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि चाकूने हल्ला करण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात येते.

याचवेळी समीरने चाकू आणून मोहनवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मोहनच्या हातावर, पोटावर, पाठीवर तसेच गळ्याजवळ वार झाले. गंभीर जखमी झालेल्या मोहनला कुटुंबीयांनी तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Advertisement

प्रकरणी सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहनच्या मृत्यूनंतर मिळालेल्या आकस्मिक मृत्यूच्या अहवालाच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये हत्येचे कलम वाढवण्यात आले.

घटनास्थळावरून चाकू जप्त-

पोलिसांनी घटनास्थळावरून काळ्या रंगाचा चाकू जप्त केला आहे. या चाकूची एकूण लांबी सुमारे ३० सेंटीमीटर असून, मूठ ११.५ सेंटीमीटर आणि धार १८.५ सेंटीमीटर आहे. पोलिसांनी हा चाकू तपासासाठी ताब्यात घेतला आहे.

कळमना पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी आरोपी समीर बांते याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अजय गर्जे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.