
नागपूर – भाजप समर्थक तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झालेल्या प्रकरणात अनेक दिवसांपासून फरार असलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालवांशी यांना अखेर कलमेश्वर पोलिसांनी अटक केली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
ही घटना २३ नोव्हेंबर २०२५ च्या रात्री कलमेश्वर येथे घडली होती. भाजपाच्या प्रचारात सक्रिय असलेल्या मातापूरा येथील आरिफ लतीफ शेख याचे रात्री उशिरा अपहरण करून नागपूरमध्ये नेऊन त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यात आधीच अनिकेत डाक (२८), रोशन यादव (३२) आणि आशुतोष खांडे (२५) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या ग्वालवांशी यांना एक दिवसापूर्वीच पकडण्यात आले. तपासादरम्यान असे उघड झाले की ग्वालवांशी यांच्यासह राजू सोनारे उर्फ राजू काल्या, आशीष गिरी, रोशन यादव, अनिकेत उईके आणि आणखी काही साथीदारांनी एकत्रितपणे आरिफवर लाठी, दगड आणि मुक्क्यांनी हल्ला केला.
हल्ल्यानंतर आरिफला जबरदस्ती कारमध्ये टाकून नागपूरच्या फ्रेंड्स कॉलनी परिसरात नेण्यात आले आणि तेथे पुन्हा मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेतून सावरत आरिफने दिलेल्या जबाबावरून कलमेश्वर पोलिसांनी अनेक कठोर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.तपास सध्या सुरू असून आणखी काही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.









