Published On : Tue, Aug 12th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खाजगी ट्रॅव्हल्सना शहरात पिकअप-ड्रॉपसाठी बंदी; १३ ऑगस्टपासून नवा नियम लागू

नागपूर : नागपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघातांच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. १३ ऑगस्ट २०२५ पासून १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत शहराच्या इनर रिंगरोड परिसरात सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत खाजगी ट्रॅव्हल्स बसेसना रस्त्यावर पार्किंग, पिकअप आणि ड्रॉप करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कोंडी आणि प्रदूषणात भर-
नागपूरची लोकसंख्या अंदाजे ३० लाख असून २० लाख दुचाकी आणि ५ लाख चारचाकी वाहने रस्त्यावर धावत आहेत. शहरातील विविध विकासकामांमुळे आणि रस्त्यांची मर्यादित रुंदी यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. सकाळी व सायंकाळी चाकरमान्यांना संथ वाहतूक आणि ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागतो.

Gold Rate
08 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,01,800 /-
Gold 22 KT ₹ 94,700/-
Silver/Kg ₹ 1,15,800/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यातच सी.ए रोड, विजय टॉकीज चौक, कॉटन मार्केट चौक, व्हेरायटी चौक, रहाटे कॉलनी चौक, रविनगर चौक, दिघोरी चौक, ऑटोमोटिव्ह चौक यांसारख्या महत्वाच्या चौकांवर खाजगी ट्रॅव्हल्सचे अनधिकृत पिकअप-ड्रॉपमुळे कोंडी, वायुप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषण वाढत आहे.

शहरात ट्रॅव्हल्सची मोठी गर्दी-
वाहतूक पोलिसांच्या अहवालानुसार—

वर्धा रोडमार्गे वर्धा, यवतमाळ, चंद्रपूरकडे ६४२ बसेस
अमरावती रोडमार्गे अमरावती, पुणे, नाशिककडे १९० बसेस
छिंदवाडा रोडमार्गे ७८ बसेस
जबलपूर रोडमार्गे भोपाल, इंदोरकडे २९६ बसेस
भंडारा रोडमार्गे गोंदिया, छत्तीसगडकडे ९२ बसेस
उमरेड रोडमार्गे गडचिरोलीकडे ३०८ बसेस
या सर्वांपैकी बहुतेकांकडे अधिकृत पार्किंग व्यवस्था नाही. पिकअप-ड्रॉपवेळी रस्त्याच्या मधोमध थांबणे आणि मोठ्या बसचा टर्निंग रेडिअस यामुळे अपघातांचा धोका वाढतो.
अधिकृत पार्किंग नसलेल्यांना प्रवेशबंदी-
फक्त ज्या ट्रॅव्हल्सकडे स्वतःची पार्किंग जागा आहे त्यांनाच तेथून पिकअप-ड्रॉपची मुभा असेल. उर्वरितांनी इनर रिंगरोड परिसरात बस थांबवणे पूर्णपणे टाळावे.

अपवाद- या नियमातून खालीलना सूट राहील:

एस.टी. महामंडळाच्या बसेस
MIHAN व MIDC कर्मचाऱ्यांच्या बसेस (परवानगीसह)
विवाह व खासगी कार्यक्रमासाठीच्या बसेस (परवानगीसह)
अॅम्ब्युलन्स, आपत्कालीन सेवा, शालेय बसेस
जेष्ठ नागरिक, महिला स्पेशल, देवदर्शन बसेस

कारवाईची तरतूद-
सदर अधिसूचना मोडणाऱ्यांवर भारतीय न्यायसहिता २०२३ चे कलम २२३ अंतर्गत कारवाई होणार आहे. बस ऑपरेटरांना ७ दिवसांची मुदत देऊन पिकअप-ड्रॉपची नवी व्यवस्था आणि प्रवाशांना पर्यायी ठिकाणांची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलीस उपआयुक्त (वाहतूक) लोहित मतानी यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले असून, “शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट केले.

Advertisement
Advertisement