बुलढाणा : राज्यातील महायुती सरकारच्या काही लोकप्रिय योजनांमुळे आमदारांना मिळणारा निधी गेल्या १० महिन्यांपासून बंद असल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी केला असून, त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्तारूढ आघाडीत खळबळ उडाली आहे. मात्र, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा दावा फेटाळून लावत “आमदारांना नियमितपणे निधी दिला जात आहे” असे स्पष्ट केले.
गायकवाड म्हणाले, “राज्यातील काही लोकप्रिय योजनांमुळे सरकार आर्थिक अडचणीत सापडले आहे. याच कारणास्तव मागील १० महिन्यांपासून एकाही आमदाराला निधी मिळालेला नाही. मात्र, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लवकरच परिस्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास दिला आहे.”
दरम्यान, गायकवाडांच्या दाव्याला उत्तर देताना मंत्री सरनाईक म्हणाले, “आमदारांना निधी मिळत नाही, हे विधान चुकीचे आहे. सर्व आमदारांना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. माझ्या विभागांतर्गत येणाऱ्या एसटी डेपो किंवा एसटी स्टँडसाठीची निधीची तरतूदही नियमितपणे केली जाते.”
‘माझी लाडकी बहीण’ योजनेवरून चर्चा
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेमुळे अर्थसंकल्पावर मोठा ताण पडल्याची चर्चा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. महायुती सरकारची ही महत्वाकांक्षी योजना असली तरी, तिची अंमलबजावणी करताना सरकारला मोठी आर्थिक कसरत करावी लागत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकार विभागांदरम्यान निधीचे फेरवाटप करून खर्च भागवत असल्याची माहितीही समोर आली आहे.