नागपूर : अल्पवयीन मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध केल्याचा राग मनात धरून तिच्या मामीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. 35 वर्षीय प्रियंका सावकर यांचे अपहरण करून त्यांना लाठीने बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या प्रियंका यांनी दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर उपचारादरम्यान अखेर प्राण गमावले. या हत्याकांडातील आरोपी अक्षय शालीकराम करोटे याला नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे.
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्रनगर परिसरात हा प्रकार घडला. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा आरोप अक्षय करोटेवर होता. मुलीची मामी प्रियंका सावकर यांनी या प्रेमप्रकरणाला विरोध केला होता. याच विरोधामुळे आरोपी संतापल्याचा आरोप आहे. त्याने आधी प्रियंका यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर संधी साधून त्यांचे अपहरण केले.
आरोपी प्रियंका यांना दुचाकीवरून वाठोडा परिसरात घेऊन गेला. तेथे लाठीने त्यांच्या डोक्यावर, हातावर आणि पायांवर अमानुषपणे वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमी प्रियंका यांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढे मेयो रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दोन दिवस उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
महिलेच्या मृत्यूनंतर प्रकरणाचे गांभीर्य वाढले आणि पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर गुरुवारी आरोपी अक्षय शालीकराम करोटे याला अटक करण्यात आली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी हत्या, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती.
या हत्याकांडाचा पुढील तपास नंदनवन पोलीस करीत असून, प्रेमप्रकरणातील विरोधातून घडलेल्या या हिंसक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.




