
नागपूर : स्वातंत्र्यदिनाची सुट्टी कुटुंबासोबत घालवण्यासाठी रिसॉर्टमध्ये गेलेल्या सात वर्षीय मुलाचा जलतरण तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाय परिसरातील अम्ब्रोशिया फार्म अँड रिसॉर्टमध्ये घडली.
मृत मुलाचे नाव अभिनंदन कमलेश नागरवाडे (७) असून तो जामठा येथील संदेश सिटी परिसरातील रहिवासी होता. अभिनंदन दुपारी साडेतीनच्या सुमारास आई-वडील आणि वडिलांच्या दोन मित्रांसोबत रिसॉर्टमध्ये आला होता. सुमारे ४ वाजता वडील आणि त्यांचे मित्र कपडे बदलण्यासाठी गेले असताना अभिनंदन जलतरण तलावाकडे गेला. याचदरम्यान तो पाण्यात बुडाला.
काही वेळाने एका व्यक्तीची नजर पाण्यात पडलेल्या अभिनंदनवर गेली. त्याने तातडीने मुलाला बाहेर काढून कृत्रिम श्वसन देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष?
पोलिसांच्या माहितीनुसार, जलतरण तलाव परिसरात मुलांची उपस्थिती असतानाही प्रशिक्षित जीवरक्षक किंवा देखरेखीसाठी कर्मचारी तैनात नव्हता. सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप आहे. अभिनंदनच्या वडिलांच्या तक्रारीवरून कोंढाळी पोलिसांनी रिसॉर्टचे मालक नरेश गणपतराव पवनीकर आणि व्यवस्थापक सुनील वसंतराव भोयर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची गंभीर दखल घेत संबंधित रिसॉर्टचा परवाना रद्द करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. कोंढाळी ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर पुढील तपास करीत आहेत.
रिसॉर्टच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह-
नागपूर-अमरावती महामार्गासह ग्रामीण भागात फार्म हाऊस, रिसॉर्ट आणि हॉटेल्सची संख्या वाढत आहे. सुट्टीच्या दिवशी येथे मोठ्या संख्येने कुटुंबे येतात. मात्र, जलतरण तलाव, कृत्रिम तलाव यांसारख्या सुविधांमध्ये प्रशिक्षित जीवरक्षक, सुरक्षा साधने आणि सतत देखरेख यांची पुरेशी व्यवस्था आहे का, हा प्रश्न या दुर्घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे.




