Published On : Sun, Apr 26th, 2020

नागपुरात अ‍ॅमेझॉनच्या सेल्समनची आत्महत्या , कारण अस्पष्ट

नागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमानगरात राहणाऱ्या अ‍ॅमेझॉन सेल्समेनने शुक्रवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. रितेश अशोक रामटेके (वय ३२) असे त्याचे नाव आहे. रितेशचे रमा नगरात दुमजली घर असून खालच्या माळ्यावर आईवडील तर वरच्या माळ्यावर रितेश, त्याची पत्नी आणि एक मुलगी असा परिवार राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी रामनगरातील माहेरी गेली.

रितेश जवळपास रोजच तिकडे पत्नी आणि मुलीला भेटायला जात होता. शुक्रवारी सकाळीसुद्धा तो पत्नीला आणि मुलीला भेटून घरी आला. त्यानंतर सायंकाळी सात वाजले तरी तो खाली आला नाही. त्यामुळे आईवडिलांनी त्याला खालून आवाज नाही. तो प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्यांनी वर जाऊन रितेशच्या रूमचे दार ठोठावले.

आवाज दिला. मात्र काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने शेजारच्यांना बोलविले. त्यांनी दाराच्या फटीतून डोकावले असता रितेश गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. त्यामुळे पोलिसांना आणि रितेशच्या पत्नीला माहिती दिली. रितेशने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली ते स्पष्ट झाले नाही. अजनी पोलिस तपास करीत आहेत.