
नागपूर : इंदौरा-दिघोरी फ्लायओव्हर सुरू होऊन अवघे पाच दिवस झाले असतानाच येथे भीषण अपघाताची घटना घडली. मोठा ताजबाग परिसरात भरधाव बुलेटने सायकलवरून जाणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थ्याला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कासिब सिद्दीकी हा आपल्या तीन-चार मित्रांसोबत रात्री सायकलवरून फिरण्यासाठी बाहेर पडला होता. मोठा ताजबागजवळ फ्लायओव्हरवरून जात असताना मागून आलेल्या बुलेटने त्याच्या सायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत कासिबसह बुलेटस्वार विजय तिडके हे देखील जखमी झाले.
अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. कासिबची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. याप्रकरणी बुलेटस्वार विजय तिडके याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताच्या नेमक्या परिस्थितीचा तपास सुरू आहे.




