Published On : Wed, Apr 29th, 2020

नागपुरात कॉरोनाबाधित ७० वर्षीय रुग्णाचा मृत्यू, मृतांची संख्या दोन

Representational Pic

नागपूर: उपराजधानीत कोरोनाबाधित ७० वर्षांच्या एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३३ एवढी आहे, तर मृतांची दोन झाली आहे

यातील बहुसंख्य रुग्णांना लक्षणे नाहीत. सतरंजीपुरा या भागातील शेकडो नागरिकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

मेडिकलमधील चार रुग्ण सोडल्यास इतरांना क्रिटीकल केअरचीही गरज पडलेली नाही. यामुळे १४दिवसांत नमुने निगेटिव्ह येऊन रुग्ण घरी जात असल्याने रुग्णांसोबत डॉक्टर, परिचारिका व कर्मचऱ्यांमध्ये समाधानाचा भाव आहे. मंगळवारी ३८, २४ व १७ वर्षीय पुरुष रुग्णाला मेयोतून घरी सोडण्यात आले. हे तिनही रुग्ण जबरलपूर येथील रहिवासी आहेत. १३ एप्रिल रोजी त्यांना मोमीनपुरा येथून आमदार निवासात क्वारंटाइन करण्यात आले होते. १७ एप्रिल रोजी या तिघांचा नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे मेयोमध्ये दाखल करण्यात आले.

सतरंजीपुऱ्यातील २८वर्षीय पुरुष, ४५, ४५ व ३८वषीय महिला यांचेही नमुने पॉझिटिव्ह आले होते. १४ दिवसांच्या उपचारानंतर २५ आणि २७ एप्रिल रोजी तपासण्यात आलेले नमुने निगेटिव्ह आले. यामुळे या सातही रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सलग दुसºया दिवशी सात रुग्ण रुग्णालयातून घरी जात असल्याने मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, नोडल अधिकारी डॉ. रवी चव्हाण, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. सागर पांडे, औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. तिलोत्तमा पराते व मेट्रन साधना गावंडे यांनी कोविड वॉर्डात सेवा देणाऱ्यांचे कौतुक केले. या रुग्णांसह मेयोतून आतापर्यंत १९ तर मेडिकलमधून १७रुग्ण असे एकूण ३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.