
नागपूर — नागपुरात आयोजित केलेल्या ‘एग्रो विजन’ या कृषी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे आज नागपुरात दाखल झाले. प्रदर्शन पाहिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली.
सलिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना भरणे म्हणाले,“ही माहिती मला तुमच्याकडूनच मिळाली आहे. मात्र एखादा मोठा नेता पक्षात येत असेल, तर त्याचे स्वागतच आहे. देशमुख कुटुंब हे या भागातील मानाचे कुटुंब आहे. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय आमचे पक्षाध्यक्ष अजित पवारच घेतील.”
एमएसपीपेक्षा कमी दरात खरेदी होत असल्याच्या तक्रारींबाबत त्यांनी स्पष्ट केले की, “जर कोणी एमएसपीपेक्षा कमी दर देत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पणन मंत्री स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. पणन विभाग आणि कृषी विभाग मिळून योग्य पावलं उचलतील.”
कुदरती आपत्तीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदनांवर भाष्य करताना भरणे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत राज्य सरकार त्यांच्यासोबत उभे आहे. पेरणीपासून कापणीपर्यंत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
नाफेड खरेदी लांबणीवर पडत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की,नाफेड खरेदीबाबत निर्णय झाला आहे. खरेदी प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू केली जाईल.शेतकऱ्यांना दिलासा देणारी आश्वासने आणि धोरणात्मक निर्णयांच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्र्यांच्या या भेटीमुळे विदर्भातील कृषी क्षेत्रात नवीन अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.









