Published On : Sat, Jul 24th, 2021

मेरा अडोस पडोस ; स्मार्ट सिटीतर्फे लहान मुलांसाठी अभिनव चित्रकला स्पर्धा

नागपूर, ता. २४ : लहान मुलांना त्यांच्या आजूबाजूला काय हवे, आपल्या परिसरात काय असायला पाहिजे, ते कसे सुरक्षित राहतील अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्या कल्पनेतून मिळावित यासाठी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने चिमुकल्यांसाठी ‘ मेरा अडोस पडोस’ अभिनव चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या गृह निर्माण व शहरी ‍विकास मंत्रालयातर्फे देशातील स्मार्ट सिटीमध्ये नरचरिंग नेबरहुड चॅलेंज हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी महाराष्ट्रातून एकमेव नागपूर शहराची निवड झालेली आहे.
आपले परिसर कसे असावे, त्यात काय कमी आहे, ते कसे परिपूर्ण होईल याबाबत मुलांमध्ये आणि पालकांमध्ये जनजागृती करणे हे मेरा अडोस पडोस स्पर्धेचे उद्देश आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस. यांनी दिली.

नरचरिंग नेबरहुड चॅलेंज अंतर्गत आयोजित होणा-या या स्पर्धेमध्ये सहा वर्षापर्यंत वयोगटातील लहान मुलांना चित्रांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनेचे शेजार कसे पाहिजे, तिथे त्यांना काय हवेसे वाटते, त्यांचे काय स्वप्न आहे याबद्दल त्यांना माझे शेजार, गल्ली किंवा खेळण्यासाठी मैदान या विषयावर चित्र काढायचे आहे. हे चित्र तयार करुन २ ऑगस्ट पूर्वी नागपूर स्मार्ट सिटीच्या गुगल फार्मच्या लिंक https://forms.gle/1LGcus5WZ1FtEXA67 वर स्कॅन करुन अपलोड करायचे आहे. तसेच पालक आपल्या पाल्यांचे चित्र ऑफलाईन सुध्दा सातवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका नागपूर, सिव्हिल लाईन्स येथे स्थित स्मार्ट सिटीच्या कार्यालयात जमा करू शकतात.

या स्पर्धेमधील प्रथम तीन विजेत्यांना प्रमाणपत्र दिले जाईल तसेच एक प्रोत्साहन प्रमाणपत्र सुध्दा देण्यात येणार आहे, अशी माहिती नागपूर स्मार्ट सिटीच्या पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी दिली. त्यांनी सांगितले की बीवीएल फाउंडेशन, डब्ल्यू आर आई सिटीज, अर्बन ९५ यांच्या सहकार्य प्राप्त होत आहे।