Published On : Tue, Sep 15th, 2020

नागपूर जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘मोहिम प्रभावी सिध्द होईल : डॉ. नितीन राऊत

आरोग्य यंत्रणेला नियोजनबद्ध रितीने मोहिम राबवण्याचे निर्देश


नागपूर : नागपूर शहर व ग्रामीण भागामध्ये कोरोना आजाराचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत आहे. या परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या काळात सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ कोरोना मुक्त महाराष्ट्र मोहिमेला घराघरातून प्रतिसाद देण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले आहे.

Advertisement

कोवीड-१९ या आजारावरचा सर्वोत्तम उपचार, म्हणजे कोवीड होऊ न देणे हाच आहे.
त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे, त्या सर्वांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नये. हातावर पोट असणाऱ्या गोर-गरीब व निम्म मध्यमवर्गीयांच्या पोटापाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन सध्या शहरात लॉकडाऊन टाळण्यात येत आहे. मात्र शहरातील गर्दी कमी होणे अतिशय आवश्यक आहे. यामुळे वृद्ध व लहान बालकांना विनाकारण संसर्गातून कोरोना बाधित व्हावे लागत आहे. आपल्यामुळे इतरांचा जीव धोक्यात येणार नाही,यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये ,असे आवाहनही त्यांनी आज जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात केले आहे.

Advertisement

राज्य शासनाचे जिल्हा व महानगर पालिका आरोग्य यंत्रणेमार्फत आपल्या घरापर्यंत भेटी देण्यासाठी आरोग्य पथक येणार आहे. या पथकाला योग्य माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले. रक्तदाब, मधुमेह व अन्य आजार असणाऱ्या वयस्क नागरिकांची माहिती या पथकाला आवर्जून देण्यात यावी, असेही त्यांनी सुचवले. तसेच ताप,खोकला, दम लागणे अशी कोवीड सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करण्याची शिफारस हे पथक करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने या पथकाने सुचविल्याप्रमाणे प्रतिसाद देत आपली चाचणी करून घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

Advertisement

सोबतच या काळात आरोग्य यंत्रणेने या मोहिमेच्या संदर्भात निश्चित करण्यात आलेल्या मापदंडाप्रमाणे पथके गठीत करावी, या पथकामार्फत दररोज पन्नास घरांच्या भेटी अपेक्षित आहे. याकाळात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनी विकार त्यासाठी आवश्यक असणारा सर्व औषधोपचार प्राथमिक आरोग्य केंद्र व संबंधित सरकारी दवाखान्यांमध्ये असेल याची काळजी घ्यावी. जर आता योग्य काळजी घेतली नाही तर आगामी काळात कोरोनाचा आणखी उद्रेक होणे शक्य आहे. त्यामुळे ज्या भागामध्ये अशा पद्धतीचे अधिक रुग्ण आहे त्या भागात नव्याने आरोग्य यंत्रणा बळकट करणे, आवश्यकतेनुसार कोरोना केंद्र उभे करणे, अशा पद्धतीचे देखील नियोजन करावे लागू शकते. त्यासाठी या पथकामार्फत योग्य माहिती गोळा होणे आवश्यक आहे. समाज माध्यमांवर काही अफवा उडाल्यामुळे आरोग्य पथकांना प्रतिसाद मिळत नसल्यास या पथकाने नागरिकांना कोरोना संदर्भात जनजागरण करणे देखील अपेक्षित आहे. यासाठी त्या त्या परिसरातील लोकप्रतिनिधी, खाजगी रुग्णालयातील स्वयंसेविका यांचा देखील या मोहिमेमध्ये सहभाग ठेवावा, असे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.

नागपूर महानगरातील कोरोना रुग्णसेवेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात वरिष्ठ स्तरावर प्रयत्न केले जात आहे. सरकारी खाजगी सर्व रुग्णालयांमध्ये मान्यताप्राप्त एकाच पद्धतीचा औषधोपचार होत आहे. नागरिकांनी अफवांना बळी न पडता उपलब्ध सुविधेचा सुयोग्य वापर करावा. आपल्याच कुटुंबातील डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील मुले जीव धोक्यात घालून वैद्यकीय उपचार करत आहेत. त्या सर्वांना सहकार्य करावे, शासकीय यंत्रणेवर विश्वास ठेवावा,असे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले आहे.

नागपुरातील बेडची उपलब्धता, ऑक्सीजन सिलेंडरची उपलब्धता, ॲम्बुलन्सची उपलब्धता, डॉक्टरांची उपलब्धता, या सर्व समस्यांवर मात करण्यात प्रशासनाला यश आले आहे. वरिष्ठ सनदी अधिकारी या सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. आपण स्वतः व गृहमंत्री अनिल देशमुख या सर्व परिस्थितीत दररोज सायंकाळी सर्व यंत्रणेचा आढावा घेत आहोत. त्यामुळे या परिस्थितीत स्वतःच्या घरात सुरक्षित राहणे व गरज नसताना बाहेर न पडणे एवढे सहकार्य सामान्य नागरिकांनी करावे,असेही कळकळीचे आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement