Published On : Wed, Mar 24th, 2021

माझी जन्मठेप :एक दृष्टिक्षेप चर्चासत्र संपन्न

Advertisement

रामटेक :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव असलेल्या माझी जन्मठेप या आत्मवृत्तांतावर श्री.नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालय रामटेकच्या मराठी अभ्यास मंडळातर्फे प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

‘माझी जन्मठेप एक दृष्टिक्षेप’ या ऑनलाइन चर्चासत्राचे उद्घाटन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गाढे अभ्यासक, समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय पोहरकर यांनी केले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी श्री. नरेंद्र तिडके महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संगीता टक्कामोरे या होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. बिंझाणी नगर महाविद्यालय नागपुरचे प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे हे होते. सर्वप्रथम शहीद दिनानिमित्त भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना आदरांजली वाहण्यात आली.

Gold Rate
07 july 2025
Gold 24 KT 96,800 /-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 1,07,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उद्घाटनपर भाषणातून डॉ.संजय पोहरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान अधोरेखांकित करून मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जाणीवपूर्वक क्रांतीचे व्रत स्वीकारणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन सर्व भारतीयांसाठी देशभक्तीचे आदर्श उदाहरण असल्याचे सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते मात्र संकुचित चष्म्यातून सावरकरांच्या कार्यकर्तृत्वाचे मूल्यमापन करणाऱ्यांना सावरकरांचे मोठेपण कळणार नाही.

‘माझी जन्मठेप :एक दृष्टिक्षेप’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी माझी जन्मठेप ही जगविख्यात साहित्यकृती असल्याचे सांगितले. या आत्मवृत्ताच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तीस भागात विभागलेल्या या आत्मवृत्तांताचे मर्म त्यांनी आपल्या भाषणातून उलगडून दाखवले. राजबंदीवानांचे तुरुंगात केले जाणारे छळ,विविध शिक्षांचे प्रकार तसेच राजबंदी यांच्या मनोधैर्याचे करण्यात येणारे खच्चीकरण या सर्वांच्या विरोधात सावरकरांनी कैद्यांचे केलेले संघटन, प्रबोधन, राष्ट्रभाषा हिंदीचा प्रचार आणि प्रसार,फिरते ग्रंथालय, विविध प्रकारचे आंदोलन करुन राजबंद्यांची विविध छळातून केलेली सुटका याचे प्रत्ययकारी वर्णन सावरकरांनी माझी जन्मठेप यातून केले असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ.संगीता टक्कामोरे यांनी माझी जन्मठेप हे प्रत्येक भारतीयांसाठी जाज्वल्य देशभक्ती चे प्रतीक असल्याचे सांगून देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र अभ्यासण्याची गरज असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन मराठी विभाग प्रमुख प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.श्रीकांत भोवते यांनी केले.या कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाइन हजेरी लावली होती.

Advertisement
Advertisement