Published On : Wed, Mar 24th, 2021

जनतेच्या मनातील शंकांच्या निवारणासाठी ‘कोव्हिड संवाद’ उपयुक्त : महापौर दयाशंकर तिवारी

Advertisement

‘कोव्हिड-१९ लसीकरण’ विषयावर तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन : मनपा-आयएमएचा संयुक्त उपक्रम

नागपूर : कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. नागरिकांमध्ये अनेक शंका आणि प्रश्न आहेत. या अशाच शंका आणि प्रश्नांच्या निराकरणासाठी मनपा आणि आयएमए यांचा संयुक्त उपक्रम असलेला ‘कोव्हिड संवाद’ हे फेसबुक लाईव्ह कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हिड संवाद’ ही श्रृंखला बुधवारपासून (ता.२४) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. बुधवारी (ता.२४) पहिल्या सत्रात ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून आयएमएच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी व सचिव डॉ. राजेश सावरबांधे यांनी ‘कोव्हिड-१९ लसीकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी ‘कोव्हिड संवाद’ची संकल्पना विषद केली. ते म्हणाले, गतवर्षी कोव्हिडच्या संकटात मनपाला सर्वच स्वयंसेवी संस्थांमार्फत मोठे सहकार्य मिळाले. याच कार्यामध्ये आयएमएची भूमिका मोठी राहिली. गृह विलगीकरणातील रुग्णांचे समुपदेशन, त्यांना मार्गदर्शन या कार्यामध्ये आयएमएने उत्तम कार्य बजावले. पुढे तत्कालीन महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकाराने सप्टेंबर २०२० पासून ‘कोव्‍हिड संवाद’ हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. त्याला सर्वच स्तरातून उत्तम सहकार्य मिळाले. नागरिकांना सतर्क करून त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य या उपक्रमाद्वारे केले जाते.

आज शहरात पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाचा आलेख वाढत असताना आयएमएने साथ दिली आहे. त्यांची संपूर्ण टिम मनपासोबत उभी आहे. नागरिकांच्या अनेक शंका, त्यांचे प्रश्न हे स्वतंत्रपणे मांडण्यासाठी पुन्हा एकदा ‘कोव्हिड संवाद’ सुरू करण्याची संकल्पना आयएमए पुढे ठेवण्यात आली. अगदी २४ तासाच्या कालावधीत त्यांनी या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला व आपल्या शहरासाठी साथ दिली आहे त्याबद्दल आयएमएचे अभिनंदन, अशा शब्दांत महापौरांनी आयएमएच्या कार्याचे कौतुक केले.

कोव्हिड संदर्भात गृह विलगीकरण आणि या काळात घ्यावयाची काळजी या संदर्भात आयएमएने माहिती पुस्तिका पीडीएफ स्वरूपात जारी केली होती. लोकजागृतीसाठी आयएमएने जारी केलेली ही माहिती पुस्तिका संपूर्ण देशभरात चर्चीली गेली. या माहिती पुस्तिकेचा आधार घेऊन आय.एम.ए.इंदूर, आई.आई.टी. पवई यांनीसुध्दा याचा उपयोग केला आणि देशभरात जनजागृती मोहिम चालविण्यात आली, ही आयएमएसाठी आणि नागपुरकर म्हणून आपणा सर्वांसाठीच अभिमानास्पद बाब आहे, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

रिक्त खाटांची माहिती केंद्रीय नियंत्रण कक्षातूनच
शहरात उपलब्ध असलेल्या बेड्सची माहिती कशी उपलब्ध होईल, या प्रश्नावर महापौरांनी स्पष्ट केले की, झोन स्तरावरील नियंत्रण कक्षाचे क्रमांक मनपातर्फे जारी करण्यात आले आहेत. मात्र या क्रमांकांवरून बेड्सची उपलब्धता माहिती होउ शकणार नाही, त्यासाठी नागरिकांना मनपाच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. शहरात उपलब्ध रिक्त खाटांची माहिती करून घेण्यासाठी ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

झोनस्तरावरील नियंत्रण कक्षातून रुग्णवाहिका, शववाहिका, कोव्हिड चाचणी केंद्र, लसीकरण केंद्र आदीबाबत माहिती दिली जाईल.

लसीकरण आवश्यकच…
‘कोव्हिड संवाद’मध्ये आयएमएच्या अध्यक्षा डॉ. अर्चना कोठारी व सचिव डॉ. राजेश सावरबांधे यांना नागरिकांकडून लसीकरणासंदर्भात विविध प्रश्न विचारण्यात आले. ‘लसीकरण करणे आवश्यक आहे का’, ‘लसीकरण का करावे’, अशा अनेक प्रश्नांचे दोन्ही डॉक्टरांनी उत्तर देत शंकांचे निराकरण केले. कोरोना विरुद्धच्या लढाईतील महत्वाचे शस्त्र म्हणून लसीकरण आवश्यक आहे. शहरात ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोव्हिशिल्ड’ या दोन लस उपलब्ध असून सध्या शासनाच्या दिशानिर्देशाप्रमाणे ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्या आणि ६० वर्षावरील ज्येष्ठांना लस देणे सुरू आहे. केंद्र शासनाने जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार आता १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील सरसकट सर्वांनाच लस दिली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरणासाठी पुढे यावे. लस सुरक्षित आहे. पॉझिटिव्ह असून गृह विलगीकरणात असलेल्यांनी घराबाहेर निघू नये. बरे झाल्याच्या १५ दिवसांच्या कालावधीनंतर डॉक्टरांच्या सल्लाने लस घ्यावी. लसीकरणाचा पहिला डोज च्या लसीचा असेल त्याच लसीचा दुसरा डोज घ्यावा. लसीकरणामुळे कुठलेही दुष्परिणाम नाही. काही साईड इफेक्ट आल्यास ते सौम्य स्वरूपातच असतात. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणासाठी पुढे यावे. लस घेतल्यानंतर आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत या आवेशात नियमांकडे दुर्लक्ष करू नका. लस घेतल्यानंतरही मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग राखणे व इतर सर्व नियमांचे पालन करा, असे आवाहन आयएमएच्या अध्यक्षा डॉ. अर्चना कोठारी व सचिव डॉ. राजेश सावरबांधे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement