नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी नागपूर शहरातील सर्व विधानसभा जागांसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारीपूर्वी सर्वच उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले.
नागपुरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत उत्साह दिसून आला. मंगळवारी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या रॅलीत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.
काँग्रेसकडून नितीन राऊत यांनी उत्तर नागपुरातून, विकास ठाकरे यांनी पश्चिम नागपुरातून, बंटी शेळके यांनी मध्य नागपुरातून, गिरीश पांडव यांनी दक्षिण नागपुरातून, तर शरद पवार गटाकडून पूर्व नागपुरातून दुनेश्वर पेठे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी संविधान चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आशीर्वाद घेतले. या रॅलीत काँग्रेससोबतच ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अनेक नेते व कार्यकर्तेही उपस्थित होते.