Published On : Wed, Jul 1st, 2020

दारू न दिल्यामुळे नागपुरात हत्या

नागपूर : दारू न दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका युवकाने मित्राचीच हत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी सक्करदरा येथील आशीर्वादनगरात घडली. मृत २८ वर्षीय अमोल शेलार आहे.

पोलिसांनी आरोपी आशिष जोत (३०) याला अटक केली आहे. अमोलच्या विरुद्ध काही वर्षापूर्वी लुटीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. आशिष याने यापूर्वी काकाच्या मुलावरही हल्ला केला होता. दोघेही ड्रायव्हर आहे. त्यांच्यामध्ये बऱ्याच काळापासून मैत्री आहे.

बुधवारी सायंकाळी ६ वाजता दोघांनी आशीर्वादनगर येथील त्रिकोनी पार्क मैदानावर बसून दारू पिली. पोलीस सूत्रांच्यानुसार आशिषने अमोलकडे आणखी दारू मागितली. अमोलने दारू देण्यास नकार दिला. त्यामुळे सुरुवातीला वाद झाला. नंतर तो मारहाणीपर्यंत पोहचला. दरम्यान आशिषने चाकू काढून अमोलवर हल्ला केला. अमोलला जखमी करून तो फरार झाला. घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलीस घटनास्थळी पोहचले.


त्यांनी अमोलला रुग्णालयात पोहचविले, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सक्करदरा पोलिसांनी लगेच आशिषला अटक केली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आठवड्यात घडलेली ही दुसरी घटना आहे.