Published On : Sat, Jun 16th, 2018

धर्मरक्षणासाठी केली हत्या; वाघमारेची कबुली

Advertisement

बेंगळुरू : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्याधर्म रक्षणासाठीच केली. त्या कोण होत्या हे मला माहीत नव्हतं, अशी कबुली लंकेश यांचा मारेकरी परशुराम वाघमारे याने दिली असे एसआयटीच्या सूत्रांनी सांगितलं.

परशुराम वाघमारे म्हणाला, धर्म रक्षणासाठी एक खून करायचा आहे, असं मला २०१७ मध्ये सांगण्यात आलं होतं. मी त्यासाठी तयार झालो. त्या कोण होत्या हे मला माहीत नव्हतं. पण त्यांना मारायला नको होतं, असं आता मला वाटतंय.

वाघमारेला ३ सप्टेंबर रोजी बेंगळुरू येथे नेण्यात आलं. बेळगावमध्ये त्याला बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. ‘लंकेश यांच्या हत्येपूर्वी मला एका घरात नेण्यात आले. तिथून बाइकवर बसून एका माणसाने मला लंकेश यांचं घर दाखवलं. दुसऱ्या दिवशी मला दुसऱ्या रूममध्ये नेण्यात आलं. तिथून पुन्हा आम्ही लंकेश यांच्या घरी गेलो. त्याच दिवशी मला गौरी लंकेश यांची हत्या करण्यास सांगण्यात आलं होतं. पण आम्ही पोहोचलो तेव्हा त्या घरात गेल्या होत्या,’ असंही वाघमारेने एसआयटीला सांगिलते.
५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ च्या सुमारास मला बंदूक देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर आम्ही लंकेश यांच्या घरी गेलो. आम्ही योग्यवेळी पोहोचलो होतो. लंकेश यांनी घराच्याबाहेर कार थांबवली होती. ज्यावेळी मी त्यांच्याजवळ गेलो तेव्हा त्या कारचा गेट उघडत होत्या. लगेचच मी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या आणि तिथून पळून गेलो. त्यानंतर रातोरात मी बेंगळुरू सोडलं,’ अशी माहिती त्याने एटीएसला दिली.

एटीएसच्या दाव्यानुसार बेंगळुरूमध्ये वाघमारे सोबत वेगवेगळ्या वेळी तीन लोक होते. एकाने त्याला बेंगळुरुला आणले. दुसऱ्याने त्याला लंकेश यांचं घर दाखवलं. तर तिसरा हत्येच्या वेळी त्याच्यासोबत होता. दरम्यान, या तिन्ही लोकांना ओळखत नसल्याचं वाघमारेनं म्हटलं आहे.