Published On : Wed, May 29th, 2019

मनपा कनिष्ठ महाविद्यालयांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Advertisement

तहसीन बानो, गुलफशा यास्मीन व दरकशा नाज मनपास्तरावर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रथम

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मंगळवारी (ता.२८) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करीत मनपाचे नाव लौकीक केले. त्यांच्या यशाबद्दल महापौरांनी सन्मानित करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

महापौर कक्षात आयोजित कार्यक्रमात महापौर नंदा जिचकार यांच्यासह विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, राजेंद्र सुके, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय उंटखाना च्या प्राचार्या रजनी देशकर, एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या निखत रेहाना, ताजाबाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या कांता वावरे, साने गुरूजी उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या कविता ठवरे यांच्यासह मनपा शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

बारावीच्या परीक्षेत मनपाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिन्ही शाखेमध्ये उत्कृष्ठ कामगिरीचे प्रदर्शन केले. कला शाखेमध्ये तहसीन बानो शफुद्दीनने ७६.४६ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. तर सकिना निसा सैय्यद आबीद अलीने ७४.७६ टक्क्यांसह दुसरा व हिना कौसर मकबुल अहमदने ७२.१५ टक्क्यांसह तिसरा क्रमांक प्राप्त केला. विशेष म्हणजे तिन्ही विद्यार्थीनी मनपाच्या एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी आहेत.

वाणिज्य शाखेमध्ये एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुलफशा यास्मीन या विद्यार्थीनीने ८१ टक्क्यांसह बाजी मारीत पहिला क्रमांक पटकाविला. एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या झबीना परवीन व ताजाबाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या शहबाज अहमद शब्बीर अहमदने समान ७३.२३ टक्के गुण मिळवित संयुक्त दुसरा क्रमांक प्राप्त केला. ७२.७६ टक्के गुण प्राप्त करणा-या एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या अल्फीशा अंजूमने तिस-या क्रमांकासह प्राविण्य मिळविले.

विज्ञान शाखेमधून एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या दरकशा नाज ने ७३.१६ टक्क्यांसह प्रथम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिमांशू रंगारीने ६६.४६ टक्के गुणांसह दुसरा व ताजाबाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या अक्शीया ताजीम मो. वसीलने ६४.०३ टक्के गुण संपादित करीत तिस-या क्रमांकावर बाजी मारली. दिव्यांग विद्यार्थ्यांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेची विद्यार्थीनी प्रिती ब्राम्हणकरने ५९.२३ टक्क्यांसह यश मिळविले. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुशश गुणसेट्टीवारने विज्ञान शाखेत ६० टक्के तर ताजाबाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या समीन काझी काझी जमीरउद्दीनने कला शाखेत ६७ टक्के गुण पटकावित यश मिळविले. मनपास्तरावर प्राविण्य मिळविलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देउन महापौर नंदा जिचकार यांनी गौरन्वित केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यंदा बारावीच्या परीक्षेत मनपाच्या चारही कनिष्ठ महाविद्यालयांचा एकूण निकाल ६१.९७ टक्के एवढा लागला असून यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा सर्वाधिक ८०.५५ टक्के तर साने गुरूजी उर्दू कनिष्ठ महाविद्यालय व एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रत्येकी ६० टक्के व ताजाबाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचा ५६.१४ टक्के निकाल लागला आहे.