Published On : Sat, May 9th, 2020

नागपुरात कर्तव्यावरील महापालिकेच्या स्वास्थ्य अधिकाऱ्याला मारहाण

Representational pic

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला देणाऱ्या कर्तव्यावरील आरोग्य अधिकाऱ्याला एक महिला आणि तिच्या दोन भावांनी बेदम मारहाण केली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान ही संतापजनक घटना घडली. रीना पुरुषोत्­तम तिवारी (वय ३८, रा. सेमिनरी हिल्स), विनोद डमरकुमार शाही (वय ४२) आणि राजेश डमरकुमार शाही (वय ३७, रा. सुरेंद्रगड, नेपाली मोहल्ला, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार संजय रूपलाल करिहार (वय ४७) हे इमामवाड्यात राहतात. ते महापालिकेचे स्वास्थ्य अधिकारी आहेत. शुक्रवारी सकाळी ते गिट्टीखदानमधील वायुसेना गेटसमोर आपले कर्तव्य बजावत होते. त्यांना रीना तिवारी ही महिला दोन लहान मुलांना घेऊन येताना दिसली. तिघांच्याही तोंडाला मास्क नव्हते आणि ते सुरक्षित अंतरही ठेवून नव्हते. सार्वजनिक ठिकाणी ते अशा बेफिकिरीने फिरत असल्याचे पाहून फिर्यादी संजय करिहार यांनी त्यांना आपली ओळख सांगितली. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी फिरणे चांगले नाही

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लहान मुलांना घेऊन तुम्ही तोंडाला मास्क न बांधता का फिरत आहात, असा प्रश्न त्यांनी केला. यावरून तिवारी यांनी करिहार यांच्यासोबत वाद घातला. त्यामुळे पुरावा जवळ ठेवण्यासाठी करिहार यांनी रीना तिवारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन मुलांचा मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न केला. ते पाहून तिवारी यांनी त्यांना शिवीगाळ केली तसेच आरोपी विनोद शाही आणि राजेश शाहीला फोन करून घटनास्थळी बोलविले. हे दोघे तेथे पोहोचले आणि त्यानंतर तिघांनी करिहार यांना बेदम मारहाण केली. त्यांचे नाकही फोडले. करिहार यांच्या मदतीला अन्य सहकारी धावले. त्यामुळे ते कसेबसे बचावले. त्यानंतर शिवीगाळ करत आरोपी तिथून निघून गेले.

करिहार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन गिट्टीखदान पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्यांच्यावर उपचार करून घेतले आणि आरोपी विनोद तसेच राजेश शाही या दोन भावांना शुक्रवारी सायंकाळी अटक केली. महिला असल्यामुळे त्यांना अटक करण्याचे शुक्रवारी सायंकाळी टाळण्यात आले. शनिवारी सकाळी रीना तिवारी यांनाही अटक करण्यात आली. या तिघांना आज न्यायालयात पाठविण्यात आले.

प्राचार्य असूनही बेजबाबदारीचे वर्तन
पोलिसांच्या माहितीनुसार, रीना तिवारी या एका कॉन्व्हेंटच्या प्राचार्य आहेत. मुलांना खबरदारीचे धडे देऊन त्यांना जबाबदार नागरिक बनविण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. मात्र अशा प्रकारचे वर्तन करून त्यांनी स्वत:च बेजबाबदारपणा दाखविला आहे.

कोरोना योद्ध्यांमध्ये असंतोष
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव सारखा वाढत आहे. त्यामुळे अवघ्या नागपूरकरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांना संसर्ग होऊ नये म्हणून आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांच्यातीलच एकाने महिलेला सजग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरच महिला आणि तिच्या भावाने हल्ला केला. ही माहिती कळल्यामुळे कोरोना योद्ध्यांत असंतोष निर्माण झाला आहे.