Published On : Thu, Sep 5th, 2019

एम्सच्या सहकार्याने मनपाच्या आरोग्य सेवेला मिळणार बळकटी : महापौर नंदा जिचकार

Advertisement

नागपूर : शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याचा नेहमीच मनपातर्फे प्रयत्न केला जात आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने आरोग्य सुविधेमध्ये बरीच सुधारण्यात करण्यात आली आहे. आता यामध्ये एम्स नागपूरची साथ मिळणार असल्याने मनपाच्या आरोग्य सुविधेला अधिक बळकटी मिळणार आहे, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

मनपाच्या दवाखान्यांमधून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहायाने उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने गुरूवारी (ता.५) नागपूर महानगरपालिका, एम्स नागपूर व टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहामध्ये आयुक्त अभिजीत बांगर, एम्स नागपूरच्या डायरेक्टर मेजर जनरल डॉ. विभा दत्ता व टाटा ट्रस्टचे आरोग्य संचालक श्रीनिवास यांनी करारावर स्वाक्षरी केली.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल उगले, उपायुक्त राजेश मोहिते, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. सरीता कामदार, कम्यूनिटी मेडिसीन विभागप्रमुख डॉ. प्रदीप देशमुख, टाटा ट्रस्टचे डॉ. अमन नवकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातील आरोग्य सुविधेच्या दृष्टीने हा मोठा करार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना फायदा होणार आहे. मनपा आरोग्य सेवेला बळकटी देणारा करार असून जास्तीत जास्त नागरिकांना या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी मनपा प्रशासनातर्फे आवश्यक सर्व प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय शहरातील स्वयंसेवी संस्थांचीही यासाठी मदत घेण्यात येईल, असे मत मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी व्यक्त केले.

एम्स नागपूरच्या डायरेक्टर मेजर जनरल डॉ. विभा दत्ता म्हणाल्या, मनपाच्या रुग्णालयामध्ये येणा-या गरीब रुग्णांना एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरसह वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सेवा देतील. गंभीर आजार असणा-या रुग्णांची विशेष देखरेख घेउन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांतर्फे करण्यात येणार आहे. याशिवाय जनआरोग्य सेवेमधील पाच हजार कर्मचारी व आशा कर्मचारी मदत करतील. या पुढाकाराने गरजवंतांना मोठा लाभ मिळणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी टाटा ट्रस्टचे टिकेश बिसेन यांनी या कराराची पार्श्वभूमी मांडली. मनपाच्या आरोग्य सेवेचा स्तर उंचाविणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. नागपूर महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण हे गरीब व गरजू असतात. त्यामुळे त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवून त्यांच्या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टरकडून योग्य निदान व्हावे यासाठी एम्स नागपूरचे तज्ज्ञ डॉक्टर उपचारासाठी सेवा देणार आहेत. यामध्ये टाटा ट्रस्टतर्फे आवश्यक ती सर्व तांत्रिक मदत पुरविली जाणार आहे. या सुविधेसाठी संपूर्ण शहरात २६ केंद्र सुरू करण्यात येणार असून शहरातील नंदनवन येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र (यूपीएचसी) येथून याची सुरूवात होणार आहे. या आरोग्य केंद्रामध्ये आठवड्यातून एकदा एम्सचे स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, फिजीशियन, सर्जन सेवा देतील. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (यूपीएचसी) पुरविण्यात येणा-या रुग्णसेवेचे एम्स व टाटा ट्रस्ट यांचेकडून वेळोवेळी वैद्यकीय सेवा गुणवत्ता तपासणीही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.