Published On : Thu, Apr 27th, 2017

मनपा शिक्षण समितीची आढावा बैठक सभापती दिलीप दिवे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न

Dilip Dive
नागपूर:
नागपूर महानगरपालिकेतील नवनियुक्त शिक्षण विशेष समितीची प्रथम बैठक शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मनपाच्या स्थायी समिती सभागृहात संपन्न झाली.

या सभेला विशेषत्वाने सत्तापक्षनेते संदीप जोशी तसेच शिक्षण समिती सभापतीच्या उपसभापती स्नेहल बिहारे, उज्ज्वला बनकर, दर्शनी धवड, प्रमिला मंथरानी, विजय झलके, इब्राहिम तौफिक अहमद, स्वाती आखतकर, राजेन्द्र सोनकुसरे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी फारूख अहमद खान, सहायक शिक्षण अधिकारी कुसूम चाफलेकर, सर्व शाळा निरीक्षक व शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

प्रस्तुत बैठक नूतन शैक्षणिक सत्र २०१७-१८ च्या पूर्वतयारीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये विद्यार्थांना पुरविण्यात येणारे मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, सर्व शिक्षा अभियान आढावा, निवासी वस्तीगृह, शाळांची पटनोंदणी डिजीटल शाळा, शिक्षकांसाठी हजेरी यंत्र, इत्यादी विषयांवर चर्चा झाली.

आगामी शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थांना स्वतः गणवेश खरेदी करून त्याचे देयक सादर केल्यानंतर त्यांचे खात्यात शासनातर्फे अनुदान जमा करण्यात येणार आहे. याचे पूर्वतयारीच्या दृष्टीने सभापती यांनी झोननिहाय शाळा निरीक्षकांकडून शाळांद्वारा विद्यार्थांच्या काढण्यात आलेल्या बँक खाते व आधार कार्ड याबाबतची माहिती तसेच येणाऱ्या अडचणीबाबत आढावा घेतला. यासोबतच शासनाकडून इयत्ता १ ते ८ मधील सर्व मुली, अनुसूचित जाती जमातीतील मुले, दारिद्र्य रेषेखालील मुले यांचेकरिता प्रति २ जोडी गणवेशकरिता निधी प्राप्त होत नाही, अशा सर्व विद्यार्थांकरिता मनपातर्फे निधी उपलब्ध करून देण्याच्या तसेच शासन जरी २०० एका गणवेशकरिता देत असले, तरीसुद्धा वस्तुस्थितीत ही रक्कम अपुरी असल्याने प्रत्येक गणवेशाकरिता अतिरिक्त १०० रूपये देण्यात यावे. या सूचना सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी करून यास समितीने एकमताने मंजुरी प्रदान केली.

आगामी शैक्षणिक सत्राच्या पूर्वतयारीच्या मौलिक सूचना करून व महानगरपालिका शाळा व विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यास्तव पदाधिकारी व अधिकारी यांना आवाहन करून सभापती यांनी सभा समाप्त केली. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन सहायक शिक्षीका मधु पराड यांनी केले.