
नागपूर, : नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी मनपाच्या शिक्षण सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा यांनी मनपाच्या सर्व झोनमधील मुख्याध्यापकांशी थेट संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी सकारात्मक नेतृत्वातून कामाची सुरुवात करीत शिक्षण विभागाच्या कामकाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचे शिक्षण सभापती लढ्ढा यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या दहाही झोनमधील शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठकी मनपाच्या लालबहादूर शास्त्री शाळा येथे घेण्यात आली. याप्रसंगी शिक्षण विशेष समितीच्या सदस्य श्रीमती भारती बुंदे, श्रीमती वैशाली उदापुरकर, श्रीमती कांचन चव्हाण, श्रीमती सय्यद मुस्कान इफान, श्रीमती वर्षा डोंगरे, यांच्यासह शिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी काटकर, उपशिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, श्रीमती खोब्रागडे उपस्थित होते.
बैठकीत मुख्याध्यापकांशी मुक्तपणे चर्चा करून त्यांच्या शाळांपुढील प्रत्यक्ष अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. बैठकीत मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळांमधील विविध समस्या लेखी स्वरूपात सादर करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. शाळांच्या इमारतींची स्थिती, युनिफॉर्म, पाठ्यपुस्तके, मध्यान्ह भोजन योजना, तसेच इतर प्रशासकीय व शैक्षणिक अडचणी यासंदर्भातील मुद्दे लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले. मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांचा आढावा घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्याचा मानस शिक्षण सभापतींनी व्यक्त केला.
यावर्षी महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वेळेत युनिफॉर्म, पाठ्यपुस्तके आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय शाळांमध्ये स्वच्छतागृहे, मदतनीस, स्वच्छता कर्मचारी यासारख्या मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत सर्व मुख्याध्यापकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपापल्या समस्या खुलेपणाने मांडल्या. या सर्व मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून लवकरच पुन्हा एक बैठक आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. महानगरपालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.








