Published On : Tue, Jul 17th, 2018

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर महापालिकेचा भर : महापौर

Advertisement

Nagpur: यंदाचा गणेशोत्सव १३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर महानगरपालिका भर देणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली. मंगळवारी (ता. १७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात गणेशोत्सव व नवरात्रोत्सव पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर प्रवीण दटके, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपनेते बाल्या बोरकर, उपनेत्या वर्षा ठाकरे, उपायुक्त नितीन कापडनीस, उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, कार्यकारी अभियंता सी.जी.धकाते, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, मोती कुकरेजा, गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभूळकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रशासनिक आढावा उपायुक्त जयंत दांडेगावकर यांच्यामार्फत घेतला. यावर्षी दहा झोनमधून ११२ कृत्रिम तलावाची मागणी आली आहे. त्यापैकी काही मागील वर्षी वापरलेले आहेत, ते यावर्षीही वापरण्यायोग्य असल्याची माहिती उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी दिली.

यावर्षी काही सेंट्रींग तलावांचा वापर करण्यात यावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. शहराबाहेर असलेल्या रिकाम्या खाणीही शोधून काढण्यात याव्या, जेणेकरून त्याचा वापर गणेशोत्सवासाठी करता येईल, असे निर्देश महापौरांनी दिले. गणेशोत्सवाच्या एकदिवसाआधी हरतालिका हा महिलांचा सण असतो, त्या सणासाठी गौर विर्सजित करण्यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. विसर्जनस्थळी निर्माल्य विसर्जित करण्यासाठी कलश ठेवण्यात यावे, संकलित केलेले निर्माल्य मनपाच्या उद्यानात कम्पोस्टिंगसाठी पाठविण्यात यावे, असे निर्देश महापौरांनी दिले.

गणेश मंडळांच्या परवानगीसाठी प्रत्येक झोनमध्ये एक खिडकी पद्घतीने ठेवण्यात यावी, अशी सूचना महापौर प्रवीण दटके यांनी केली. धर्मादाय ट्रस्ट, अग्निशमन विभाग, एसएनडीएल, पोलिस विभाग, वाहतूक विभाग या सहा विभागांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना मनपाच्या दहाही झोनमध्ये सुरू करण्यात यावी, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. परवानगी ऑनलाईन पद्धतीने करता येईल का, याबाबतही विचार करण्यात यावा, असे निर्देश महापौरांनी दिले.याबाबत पालकमंत्र्यांशीही चर्चा करून त्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल, असे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले.

कृत्रिम तलावाजवळ व विसर्जन मार्गावर विद्युत व्यवस्था सुरळीत राहिल याची व्यवस्था करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले. पीओपी मूर्ती विक्रेत्यांनी सर्वात आधी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी करताना त्यांना शासनाच्या अटी सांगण्यात याव्यात, अशी सूचना ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी केली.

मागीलवर्षी शहरातील सक्करदरा, सोनेगाव, गांधीसागर तलावात गणेश मूर्ती विसर्जन पूर्णत: बंद होते. त्यामुळे तलावाचे सौंदर्यीकरण अबाधित राहिले. यंदाही या तलावांवर गणेश विसर्जन न करता कृत्रिम तलाव तयार करून त्यातच लोकांना मूर्ती विसर्जन करण्यासाठी विनंती करण्यात यावी. शिवाय प्रत्येक झोनमधील विसर्जन स्थळांची माहिती देण्यासाठी मागील वर्षी ‘ॲप’चे लोकार्पण करण्यात आले. त्याचा नागरिकांसह मनपालाही खूप फायदा झाला. यंदाही ‘ॲप’च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नि:शुल्क ‘हेल्पलाईन’ नंबर जाहीर करून त्याची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी, असेही महापौर श्रीमती जिचकार यांनी सांगितले.

दरवर्षी फुटाळा तलाव येथे मोठ्या मूर्तींचे विसर्जन होत असते. त्यामुळे फुटाळा तलावात प्रदूषणाचे प्रमाण वाढते. यावर्षी फुटाळा तलावावरील प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेद्वारे काही उपाययोजना करता येईल का, याचा विचार करावा, असे महापौर नंदा जिचकार यांनी सूचित केले.

तलावाला बाजूने अस्थायी स्वरुपात सभोवताल शेड टाकण्यात यावे आणि त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात यावा, असे निर्देश श्रीमती नंदा जिचकार यांनी दिले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील मोठ्या मंडळांसोबत मंगळवारी २४ जुलैला बैठक राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सामाजिक संस्था व झोन सभापती यांना आमंत्रित करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घ्यावा
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले. पर्यावरणपूरक गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कोणत्याही नवीन कल्पना मंडळाकडे किंवा सामाजिक संस्थेकडे असल्यास त्यांनी सूचवाव्यात, मनपा त्या सूचनांचे स्वागत करेल, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.