Published On : Wed, Jun 2nd, 2021

ई-कचरा संकलन व व्यवस्थापनातून मनपाला मिळणार महसूल

महापौर दयाशंकर तिवारी यांची अभिनव संकल्पना

नागपूर : ई-कचरा सध्या सर्वत्र समस्या ठरत आहे. नागरिकांच्या घरी वर्षानुवर्षे हा कचरा तसाच पडलेला आहे परंतु यापासून संभाव्य धोका त्यांना लक्षात आला नाही. ही बाब लक्षात घेत नागपूर शहरातील ई-कच-याचे योग्यरित्या संकलन आणि व्यवस्थापन केल्यास नागपूर महानगरपालिकेला महसूल प्राप्त होउ शकेल, अशी अभिनव संकल्पना शहराचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी मांडली आहे.

Gold Rate
26 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,400 /-
Gold 22 KT ₹ 1,06,400 /-
Silver/Kg ₹ 1,38,100/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहराचा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चौफेर विकास होत आहे. त्यादृष्टीने ओला, सुका कचरा व्यवस्थापनाप्रमाणेच ई-कच-याकडेही लक्ष देणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यादृष्टीने मनपाने पुढाकार घेतला आहे. आजघडीला संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक ई-कचरा निर्माण होणा-या दहा शहरांमध्ये नागपूर शहराचा समावेश आहे. शहरात कचरा व्यवस्थापनासाठी दोन स्वतंत्र कपन्याना नियुक्त करून सुसूत्रता आणण्यात आली आहे. मात्र ई-कच-याची विल्हेटवाट लावण्याची व्यवस्था नागपूर शहरामध्ये नाही. त्यादृष्टीने ही महत्वपूर्ण संकल्पना महापौरांनी मांडली आहे. त्या अनुषंगाने स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी याचा समावेश मनपाच्या अर्थसंकल्पामधे केला आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या अभिनव संकल्पनेचे स्वागत केले आहे.

त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून वेंडर निर्धारित करून करून ई-कच-याची त्याला विक्री करण्यात आली व त्या वेंडरला शासकीय धोरणानुसार व नियमानुसार ई-कच-याची विल्हेवाट लावण्याचे काम देण्यात आल्यास शहरातील ई-कचरा संपूष्टात येईल. याशिवाय या कच-यातून नागपूर महानगरपालिकेला वर्षाला ४ ते ५ कोटी रुपये उत्पन्न होणे अपेक्षित आहे. मनपाच्या माध्यमातून ई-कच-याची विल्हेवाट लावून पर्यावरण संरक्षणासोबतच नवीन मार्गातून उत्पन्नाचे साधन उभे करता येतील, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी नमूद केले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेचा ई-कचरा विल्हेवाट करण्याची एक नियमावली रिझर्व्ह बँकेने तयार केली आहे. पुढील पाउल म्हणून मनपाने तत्सम व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास त्या माध्यमातून आणखी उत्पन्नात भर पडेल. यादृष्टीने मनपाने पुढाकार घेतला असून प्रायोगिक तत्वावर शहरातील कचरा संकलन एजन्सी मार्फत आठवड्यातील एक दिवस संपूर्ण शहरातून केवळ ई-कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला दिले आहे.

मनपाच्या या महत्वपूर्ण पुढाकारामुळे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मोठे पाउल उचलले जाणार आहे. घरात वर्षानुवर्षे पडून राहिलेले बॅटरी, बंद पडलेले मोबाईल, चार्जर, रिमोट, हेडफोन व अन्य ईलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या धोकादायक ठरू शकतात. त्याचे योग्य व्यवस्थापन करून शहराला व शहरातील पर्यावरणाला मोठ्या हानीपासून वाचविण्याच्या दृष्टीने महापौर दयाशंकर तिवारी यांनी अभिनव संकल्पना मांडली आहे.

Advertisement
Advertisement