Published On : Mon, Aug 9th, 2021

मनपा-महामेट्रो एकत्र येऊन देणार ई-वाहनांना प्रोत्साहन

संयुक्त बैठकीत सर्वसंमतीने महापौरांनी घेतला निर्णय

नागपूर : नागपुरात वाहनांची संख्या वाढत चालल्याने वायू प्रदुषणात प्रचंड वाढ होत आहे. यावर आताच अंकुश लावण्यात आला नाही तर भविष्यात वाहतुकीच्या समस्येसोबतच वायू प्रदुषणाची मोठी समस्या निर्माण होईल. यावर उपाय म्हणून आता नागपूर महानगरपालिका आणि महामेट्रो एकत्र येऊन ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करेल. हा निर्णय महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ९) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

बैठकीत सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, मुख्य अभियंता लिना उपाध्ये, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे आणि महामेट्रोचे सहमहाव्यवस्थापक (फीडर सर्विस) महेश गुप्ता उपस्थित होते.

बैठकीत बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, वायु प्रदुषण लक्षात घेता नागपुरात पर्यावरणपूरक वाहतुकीची आवश्यकता आहे. महामेट्रोतर्फे सुभाष नगर मेट्रो स्टेशन वर १८ ई-रिक्षा ठेवण्यात आले आहे. याचा वापर प्रवाशांसाठी होतो. मेट्रोतर्फे प्रवाशांसाठी सायकलचीही व्यवस्था करण्यात आली होती. आता ई-स्कूटरसुद्धा उपलब्ध करण्यात आले आहेत. मनपातर्फे पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महामेट्रोसोबत काम केले जाईल. यातून नव्या पिढीला रोजगारसुद्धा मिळेल आणि मेट्रोमधील प्रवाशांच्या संख्येतसुद्धा वृद्धी होईल.

महामेट्रोचे महेश गुप्ता यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून नागपुरातील वाहतुकीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, नागपुरात सध्या १५ लाख वाहन रस्त्यावर धावत आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार, २०१७ मध्ये १२ लाख दुचाकी, एक लाख चार चाकी, १५ हजारपेक्षा जास्त ऑटोरिक्षा आहेत. महा मेट्रो, मनपातर्फे प्रवासी संख्या वाढविण्यासाठी टी. ओ. डी. पॉलिसी मंजूर करण्यात आली आहे. वर्धा रोड आणि हिंगणा रोड नंतर आता मेट्रो कामठी रोडवर सुद्धा धावणार आहे. मेट्रोतर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी फीडर सर्व्हिस सुरु करण्यात आली आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिक मेट्रोमध्ये प्रवास करतील असा प्रयत्न सुरु आहे. मेट्रोच्या सर्व्हेक्षणानुसार नागपुरात ४५ टक्के नागरिक सायकलचा वापर करतात अथवा पायी चालतात. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ई-वाहनांनावर भर देण्याची गरज असून नागरिकांसाठी कमीत-कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.