Published On : Mon, Jan 1st, 2018

सोख्ता भवनमुळे मनपाची आर्थिक स्थिती सुधारणार : महापौर नंदा जिचकार

नागपूर : शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या सोख्ता भवन येथे नवीन व्यावसायिक इमारत नागपूर महानगरपालिका बीओटी तत्त्वावर निर्माण करीत आहे. या प्रकल्पामुळे मनपाच्या तिजोरीत भर पडणार असून नागरिक आणि व्यावसायिकांच्या सोयीचेदेखिल होणार असल्याचा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत प्रकल्पाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या.

यावेळई प्रामुख्याने माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, नगरसेवक पिंटू झलके, प्रतोद दिव्या धुरडे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, अतिरिक्त आयुक्त आर.झेड. सिद्दीकी,मुख्य अभियंता विजय बनगीरवार, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता (ज.प्र) संजय गायकवाड, विकास अभियंता सतीश नेरळ, कार्यकारी अभियंता (पेंच प्रकल्प) अनिरुद्ध चौगंजकर, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, एडीटीपीचे पी.बी.गावंडे यांची उपस्थिती होती.

महानगरपालिकेच्या प्रस्तावित बीओटी, पीपीपी, केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी माजी महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. बैठकीत ऑरेंज सिटी प्रकल्प, सोख्ता भवन, महाल बाजार, बुधवार बाजार, सक्करदरा बाजार, बाळासाहेब ठाकरे स्मारक, चिटणीसपुरा, साई प्रकल्प (स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडिया), नागनदी प्रकल्प, मोक्षधाम पुलाचे बांधकाम आदी विषयांवर चर्चा झाली.

बैठकीत विविध प्रकल्पांची गती वाढविण्यासाठी आवश्यक सर्व पूर्तता अधिका-यांनी कराव्यात, असे निर्देश समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिले. यावेळी कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण कऱण्यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नसून काही अडचण असल्यास थेट आपल्याशी संपर्क साधा,असे मनपा आय़ुक्तांनी सांगितले.

सोख्ता भवन प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना निमंत्रित करुन त्यांनाप्रकल्पाची माहिती द्यावी असे ठरविण्यात आले. नागरिकांना याद्वारे उपलब्ध होणा-या सुविधांची माहिती देणारे बॅनर लावण्याचेही निर्देश विभागाला देण्यात आले. सोख्ता भवन प्रकल्पाच्या नवीन वास्तूचे नावही ‘सोख्ता’ राहणार असून यामध्ये मनपाच्या मालकीचे एक भव्य सभागृह असणार आहे. या इमारतीसाठी तसेच परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी भव्य पार्किंगची सोय आहे. यामध्ये सोख्ता भवनच नव्हे तर परिसरातील नागरिकांसाठीही पार्किंगची सोय होईल अशी व्यवस्था आहे. याद्वारे अग्रेसन चौक, सीए रोड येथील नागरिकांची पार्किंगची समस्या सुटणार आहे.