नागपूर – नागपूर महानगरपालिका (मनपा) तर्फे ऑरेंज सिटी स्ट्रीटवर प्रस्तावित करण्यात आलेला अधिकृत बाजार हा केवळ एक दिखावा असून, तो पथविक्रेत्यांच्या पुनर्वसनाच्या मूळ उद्देशाला फाटा देतो, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मनपाकडून अतिक्रमणाच्या नावावर सातत्याने पथविक्रेत्यांवर कारवाई केली जात असून, या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पथविक्रेत्यांसाठी कायमस्वरूपी अधिकृत बाजार निर्माण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासक अभिजीत चौधरी यांनी आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्यामार्फत या बाजाराचा आराखडा तयार केला.
मात्र मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प मनपा स्वतः उभारणार नसून, खाजगी विकासकाच्या भागीदारीत उभारला जाणार आहे. यामध्ये तळमजल्यावर मोठे शोरूम्स असणार असून त्याची विक्री खाजगी विकासक करणार आहे, तर पहिल्या मजल्यावर भाजी व मटण बाजार असेल.
ही संकल्पना पूर्णतः चुकलेली असून, मनपा नागरी सुविधा निर्माण करण्यात अपयशी ठरत आहे तसेच पथविक्रेत्यांच्या उपजीविकेच्या अधिकारांचं संरक्षण करण्यातही कमी पडत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर आज नागपूर प्रेस क्लबमध्ये शहरातील विविध वृत्तवाहिन्यांच्या मुख्य संपादकांसमोर ही सविस्तर माहिती मांडण्यात आली. मनपाकडून खाजगी विकासकांच्या माध्यमातून सुरू असलेला चुकीचा कारभार नागरी सुविधांवर कसा विपरित परिणाम करत आहे यावर चर्चा करण्यात आली.