
नागपूर : चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या उमेदवार निवडीवरून भाजपमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष अद्याप शमलेला नसून, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद नागपुरातील बैठकीत पुन्हा एकदा उफाळून आला. रविवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या आधी गुरुवारी याच मुद्द्यावर झालेली बैठक वादळी ठरली होती. त्यानंतर रविवारी झालेल्या बैठकीत मुनगंटीवार आणि जोरगेवार या दोन्ही गटांनी भाजपकडे स्वतंत्र उमेदवार याद्या सादर केल्या. मात्र, वाढता तणाव पाहता पक्षश्रेष्ठींनी चंद्रपूरमधील उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सोपवला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस आज यावर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता असून, त्यानंतर मंगळवारी भाजपच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होऊ शकते.
दरम्यान, नागपूर येथील विदर्भ कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती, निवडणूक प्रभारी माजी खासदार अशोक नेते, भाजप शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी शहराध्यक्ष राहुल पावडे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
नागपूर महापालिकेतील १५१ जागांवर भाजपची तयारी पूर्ण-
दरम्यान, नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संपूर्ण १५१ जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली असल्याची माहिती आहे. भाजप–शिवसेना युतीबाबतची चर्चा सकारात्मक टप्प्यात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या वाट्याला जाणाऱ्या जागांवर सुचवलेल्या नावांवरही चर्चा झाली.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप चर्चेसाठी बोलावले नसल्याने त्यांचा युतीतील सहभाग अनिश्चित मानला जात आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी करण्यावर काँग्रेस ठाम असून, मित्रपक्ष सन्मानजनक जागावाटपावर अडून बसल्याने चित्र अद्याप अस्पष्ट आहे. काँग्रेसने ‘१०० प्लस’ जागांचा नारा दिला असून, उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने आज उशिरापर्यंत राजकीय गणिते स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मुनगंटीवारांचे चार निकष चर्चेच्या केंद्रस्थानी-
याआधी झालेल्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवार निश्चितीसाठी चार ठोस निकष मांडल्याची माहिती आहे.
त्यामध्ये एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांना उमेदवारी देऊ नये, निष्क्रिय नेत्यांच्या मुलांना तिकीट देण्यात येऊ नये,अलीकडेच (एक-दोन महिन्यांपूर्वी) पक्षात प्रवेश केलेल्यांना उमेदवारी देऊ नये,सर्वेक्षण अहवाल आणि इलॅक्टोरल मेरिटच्या आधारेच उमेदवार निश्चित करावेत,अशा स्पष्ट अटी त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर ठेवल्याचे समजते.चंद्रपूरमधील राजकीय पेच आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अवलंबून असून, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








