
समृद्धी महामार्गासाठी शेतजमिनी थेट खरेदी करण्यासाठी रेडिरेकनरच्या पाच पट दर जाहीर करूनही दोन महिन्यांत शेतकऱ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आतापर्यंत १०० हेक्टरहून अधिक जमिनीची खरेदी झाली असून ४०० शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास संमती दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे. काही गावांतून या महामार्गास कडाडून विरोध केला जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे शिवडे.
या गावात आजतागायत मोजणीची प्रक्रियादेखील झालेली नाही. प्रशासनाने मोजणीचा प्रयत्न केल्यास शेतात आत्महत्या करण्याचा इशारा याआधी शेतकऱ्यांनी दिला होता. त्यासाठी शेतांमध्ये झाडांना लावलेले फास आजही तसेच आहेत. अलीकडेच झालेल्या समृद्धीबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत काळी दीपावली साजरी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार दोन्ही तालुक्यांत २० ते २५ गावांमध्ये बाधित शेतकऱ्यांनी घरावर काळे आकाशकंदील लावल्याची माहिती समितीचे पदाधिकारी राजू देसले व शिवडे येथील शेतकरी संदीप हरक यांनी दिली.
शिवडे गावात सकाळी बाधित शेतकरी मध्यवर्ती भागात एकत्र झाले. गावात काळ्या रंगातील भव्य आकाशकंदील लावण्यात आला. त्याद्वारे काळी दिवाळी साजरी करीत असल्याचे सूचित करण्यात आले. समृद्धी महामार्ग व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कोणत्याही स्थितीत शेतजमीन दिली जाणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सूचित केले.
समृद्धी महामार्गातून बागायती व पिकाऊ क्षेत्र वगळण्याची गरज आहे. जिल्ह्य़ात बहुतांश शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध दर्शवूनही प्रशासनाने खरेदीचे दर जाहीर केले असा आक्षेप नोंदविण्यात आला.








