
नागपूर : मुंबईत गुरुवारी सकाळी घडलेली पवईतील ओलीसनाट्याची घटना राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या थरारक प्रकरणाचा धागा थेट नागपूरशी जोडला गेला आहे. आरोपी रोहित आर्या हा नागपूरचा रहिवासी असून, तो शाळाशिक्षक आणि यूट्यूबर म्हणून कार्यरत होता. ‘लेट्स चेंज’ या नावाने तो यूट्यूबवर सामाजिक विषयांवर व्हिडिओ बनवत असे. मात्र त्याच्याच आयुष्यातील “चेंज” इतकं भयावह ठरेल, हे कुणालाच अपेक्षित नव्हतं.
गुरुवारी सकाळी त्याने ‘लेट्स चेंज’ या नावाच्या वेबसिरीजसाठी ऑडिशन घेत असल्याचं सांगत राज्यभरातील ग्रामीण भागातील मुलांना मुंबईत बोलावलं. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील मुलं या ऑडिशनसाठी आली होती. तब्बल १०० मुलांपैकी ८० मुलांना घरी पाठवून, उर्वरित १७ मुलांना त्याने आरे स्टुडिओमध्ये डांबून ठेवलं.
घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवळपास दोन तास रोहित आर्याशी पोलिसांची फोनवरून चर्चा सुरू होती. सुरुवातीला त्याने शिवसेना (शिंदे गट) नेते दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केली होती, मात्र नंतर त्याने तीही मागणी मागे घेतली. पोलिसांना मात्र आर्याचा उद्देश समजत नव्हता — तो नेमकं काय मागतोय, हे स्पष्ट सांगितलं गेलं नव्हतं.
दरम्यान, एपीआय अमोल वाघमारे यांच्या पथकाने टॉयलेटच्या खिडकीमार्गे आत प्रवेश करून थरारक कारवाई केली. त्यावेळी रोहित आर्याकडे एअरगन आणि काही ज्वलनशील पदार्थ असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुलांचा जीव धोक्यात येईल, असा संशय आल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. छातीत गोळी लागल्याने आर्या गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सर्व १७ मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नागपूर पोलिसांकडूनही आर्याच्या पार्श्वभूमीचा तपास सुरु करण्यात आला आहे. स्थानिक सूत्रांच्या मते, आर्या यूट्यूबवर ‘सामाजिक बदल’ या नावाखाली काही वादग्रस्त व्हिडिओ बनवत होता. काही काळापासून त्याच्या वर्तणुकीत बदल दिसत असल्याचंही सांगितलं जात आहे.
या घटनेनं नागपूर-मुंबई दरम्यानचा एक काळा दुवा समोर आला आहे. “सामाजिक संदेश” देणाऱ्या यूट्यूबरच्या मनातील विकृतीनं १७ चिमुकल्यांचा जीव धोक्यात आला; पण पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे अखेर सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं.








