
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात आरोग्यसेवेचे नवे पर्व सुरू झाले आहे. SEARCH संस्थेच्या सहकार्याने राज्य सरकारने ‘मोबाईल मेडिकल युनिट्स’च्या माध्यमातून आरोग्य सेवा थेट जंगलांपर्यंत पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि मागासलेल्या जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत सरकारी आरोग्य यंत्रणा पोहोचावी, या उद्देशाने हा आरोग्य विस्तार प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच एक ऐतिहासिक करार करण्यात आला असून, त्याअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर तसेच आशा कार्यकर्त्यांना SEARCH संस्थेत विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
हे प्रशिक्षण एकाच वेळी सर्व स्तरांवरील आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले जात असल्याने, हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग ठरत आहे. गावागावात त्रिस्तरीय आरोग्यसेवेची अंमलबजावणी करताना या उपक्रमामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागांतील आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे. पुढील काळात या भागात स्थानिक संस्कृती आणि परंपरा लक्षात घेऊन आरोग्य सेवा राबविण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.
जंगलात आरोग्याची रुग्णवाहिनी-
धानोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोबाईल मेडिकल युनिट्सद्वारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी दर आठवड्याला सेवा देत आहेत. पूर्वी ज्या भागात प्राथमिक आरोग्य सुविधा मिळणे कठीण होते, तिथे आता घरबसल्या तपासणी, औषधोपचार आणि सल्ला मिळत आहे.
मोफत आरोग्य तपासणी मोहिमेमुळे आदिवासी नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, या सेवेने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात सुरू झालेली ही उपक्रमात्मक चळवळ केवळ आरोग्यसेवेचा विस्तार नाही, तर आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीचा एक क्रांतिकारी टप्पा ठरत आहे.










