जळगाव : मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एरंडोल तालुक्यातील पिंपरी बुद्रुक फाट्याजवळ रविवारी झालेल्या भीषण अपघातात कबीर मठाचे महंत प्रियरंजन दास (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे.
प्रियरंजन दास बंगळुरू येथील कबीरपंथाच्या धार्मिक कार्यक्रमातून परत पिंपरी बुद्रुकला येत होते. पिंपरी फाट्यावर आल्यानंतर स्थानिक तरुण प्रवीण नारायण पाटील यांनी त्यांना दुचाकीवर बसवून घरी घेऊन जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात महंतांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार जखमी झाला.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती कळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते.
महंत प्रियरंजन दास गेल्या चार वर्षांपासून पिंपरी बुद्रुक येथील कबीर मठात आचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे कबीरपंथीयांमध्ये हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.