Published On : Mon, Jul 22nd, 2019

नागपूर पर्यटक निवास येथे एमटीडीसीचे ‘ऑरेंज उपहारगृह’ सुरु

Advertisement

नागपूर: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नागपूर येथील सिव्हील लाईन येथे सर्व सोयींनी युक्त असे पर्यटक निवास उभारले आहे. या पर्यटक निवासात एमटीडीसीद्वारे नुकतेच “एमटीडीसी ऑरेंज” हे शाकाहारी व मांसाहारी उपहारगृह सुरु करण्यात आले. या उपहारगृहात राज्यातील विविध भागातील खाद्यपदार्थ मिळणार असून यामुळे राज्यातून तसेच देश-विदेशातून नागपुरात येणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

एमटीडीसीचे मुख्य लेखा अधिकारी दिनेश कांबळे यांच्या हस्ते नुकतेच नागपुरातील ऑरेंज उपहारगृहाचे उद्घाटन संपन्न झाले.

एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अभिमन्यू काळे म्हणाले की, राज्यासह विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीमार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. बोदलकसा (जि. गोंदिया) येथील एमटीडीसीच्या निसर्गरम्य पर्यटक निवासात नुकतेच उपहारगृह सुरु करण्यात आले आहे. आता नागपूर शहरात ऑरेंज रेस्टॉरंट सुरु करुन पर्यटकांची अधिक सोय करण्यात आली आहे. एमटीडीसीमार्फत राज्यातील विविध भागात पर्यटक निवास (रिसॉर्टस्) चालवले जातात. विदर्भातही असे अनेक पर्यटक निवास आहेत. नागपूर, बोदलकसा आदी पर्यटक निवासांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पर्यटकांनी महामंडळाच्या पर्यटक निवासांना भेट देऊन पर्यटनासोबत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचे आवाहन श्री. काळे यांनी केले आहे. पर्यटक निवासाच्या नोंदणीसाठी एमटीडीसीच्या maharashtratourism.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.