Published On : Mon, May 3rd, 2021

कोविडमध्ये महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत ऑक्सीजन प्रकल्प, कोविड रुग्णालयांना

Advertisement

मागेल तेव्हा तात्काळ वीजजोडणी उपलब्ध


नागपूर: राज्यातील कोरोनाच्या आपत्कालिन स्थितीत ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना व कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार तात्काळ कार्यान्वित करण्याच्या कार्यवाहीसाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात राज्यातील 10 मोठ्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना 24 ते 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 35 कोविड रुग्णालयांना देखील तात्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.

राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोविड बाधीतांच्या उपचारासाठी ऑक्सीजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यासाठी ऑक्सीजन निर्मितीला मोठा वेग देण्यात आला आहे. त्यासाठी नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराची मागणी होत आहे. ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प तसेच कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर कामे करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे ही अत्यावश्यक सेवा देण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर सज्ज राहण्याची सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी दिल्या आहेत. परिणामी ज्या कामांना इतर वेळी साधारणतः 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो, ती कामे महावितरणकडून अवघ्या 24 ते 48 तासांमध्ये युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. यासाठी प्रशासकीय तसेच तांत्रिक सोपस्कार बाजूला ठेवत महावितरणकडून प्राधान्याने कार्यवाही करण्यात आली आहे.

गेल्या महिन्याभरात तब्बल 10 ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना महावितरणने अवघ्या 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराची सेवा दिली आहे. एकूण 14 हजार केव्हीए क्षमतेपेक्षा अधिक वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. सोबतच राज्यात ऑक्सीजन निर्मितीला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. यामध्ये के चंद्रा इंजिनिअरींग वर्क्स (जेजूरी, जि. पुणे), ऑक्सीएअर नॅचरल रिसोर्सेस (रांजणगाव, जि. पुणे) या 20 मेट्रीक टन क्षमतेच्या ऑक्सीजन प्रकल्पांना केवळ 48 तासांमध्ये 523 केव्हीए वीजभाराची नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली.

ऑक्सीजन प्रकल्पांची तातडीने क्षमता वाढ करण्यासाठी वाढीव वीजभाराची गरज निर्माण झाली होती. त्याबाबतचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मंजुरी व आवश्यक तांत्रिक कामे ग्राहकांकडून पूर्ण झाल्यानंतर केवळ 24 ते 48 तासांमध्ये वाढीव वीजभार कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणकडून करण्यात आली आहे. यामध्ये जेएसडब्लू (डोलवी, जि. रायगड) कंपनीला मागणीप्रमाणे दोन टप्प्यात 109 एमव्हीए क्षमतेचा वाढीव वीजभार मंजूर करून कार्यान्वित करण्यात आला आहे. सोबतच के नायट्रोक्सीजन (सातारा), सोना अलॉयज (लोणंद, जि. सातारा), मॉडर्न गॅस इंडस्ट्रिज (अंबरनाथ, जि. ठाणे), स्वस्तिक एअर प्रॉडक्ट्स (सिन्नर, जि. नाशिक), अहमदनगर इंडस्ट्रीयल गॅसेस (अहमदनगर), लिंडे इंडिया (पनवेल, वाशी) कंपनीचा समावेश आहे. यातील अनेक कामांमध्ये ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल तसेच संबंधीत जिल्हाधिकारी यांनी एकाच वेळी थेट चर्चा करून मुंबई मुख्यालयाच्या अखत्यारीतील विषय मार्गी लावले आहेत, हे विशेष.

यासोबतच गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये नव्याने उभारलेल्या कोविड रुग्णालयांना नवीन वीजजोडणी देण्याची कामे महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु आहेत. आतापर्यंत राज्यातील 35 कोविड रुग्णालयांना 24 ते 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 11, अहमदनगर- 6, पुणे व नंदुरबार जिल्हा- प्रत्येकी 4, नाशिक, ठाणे व नागपूर- प्रत्येकी 2, धुळे, औरंगाबाद, पालघर जिल्हा – प्रत्येकी एक आणि मुंबई उपनगरातील मुलुंड येथे एक अशा एकूण 35 कोविड रुग्णालयांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.