नागपूर: येत्या 16 डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.हे पाहता सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.दरम्यान शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने युद्धस्तरावर तयारी ठेवली असून, यासाठी शहरातील सर्व विकास यंत्रणांनी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
नागपूर शहरात मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पाणीपुरवठा, महानगरपालिका, दूरसंचार विभाग, खासगी इंटरनेट आणि केबल टीव्ही कंपन्या यासारख्या अनेक विभागांमार्फत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत.
यामुळे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आणि अधिवेशनादरम्यान कुठल्याही यंत्रणेने किंवा नागरिकांनी शहरात खोदकाम करु नये, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
हिवाळी अधिवेशन काळात व्हीव्हीआयपी परिसरात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरणकडून येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. एका लाइनमध्ये बिघाड झाल्यास दुसऱ्या लाइनमधून वीजपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वीजपुरवठा सुरळीत राखण्यासोबतच महावितरणचे कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत.