Published On : Sat, Jan 19th, 2019

वीजग्राहकांना मोबाईलवर मीटर रिडींगची माहिती

Advertisement

Mahavitaran logo

नागपूर : महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने दि. १ फेब्रुवारी २०१९ पासून वीजबिलावरील मीटररिडींगचा फोटो देण्याची पध्दत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वीजबिलाबाबतची तसेच इतर महत्वाची माहिती मिळविण्यासाठी ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रिडींगची अचूक माहिती मिळावी म्हणून देशात महावितरणने सर्वप्रथम वीजबिलावर मीटर रिडींगचा फोटो छापण्याची पध्दत सुरू केली होती. या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदाही होत होता. मात्र यात बील तयार झाल्यानंतर ग्राहकांना मीटरच्या रिडींगचा फोटो उपलब्ध होत होता. परंतु आता महावितरणकडून ज्या ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे, अशा ग्राहकांना महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे दिली जाते. त्यामुळे मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीजबील मिळण्यापूर्वीच मीटर रिडींग घेताच त्याची माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली जाते. परिणामी ग्राहकांना आपले मीटर रिडींग पडताळणीसाठी उपलब्ध राहील. तसेच मीटर रिडींगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्रि क्रमांक अथवा नजिकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरूस्त करता येणे शक्य होईल.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

फोटो मीटर रिडींग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीही ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्राहकांना चालू महिन्यातील मीटरचा फोटो पाहण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर सुविधा उपलबध करून देण्यात येईल. तसेच मीटरचा फोटो न छापल्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागेवर ग्राहकांना वीजबिलासंबंधी पुरक माहिती देण्यात येईल.

महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG(स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24×7 सुरु असणार्‍या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्रि क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

सर्व वर्गवारीतील सुमारे दोन कोटी सात लाखापेक्षा अधिक वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली आहे. उर्वरित वीजग्राहकांनीही महावितरणच्या वीजसेवेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Advertisement
Advertisement