Published On : Wed, Jun 2nd, 2021

मा.श्री. रणजीतबाबू देशमुख यांच्या ७५व्या वाढदिवशी ल.मं.हॉ.येथे विविध वर्गातील ‘कोविड देवदूतांचा’ केला सत्कार

व्हीएसपीएम अकॅडेमी ऑफ हायर एज्युकेशन, नागपूरचे अध्यक्ष व माजी मंत्री मा.श्री. रणजीतबाबू देशमुख यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्य संस्थेअंतर्गत कार्यरत एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर यांच्यावतीने २९ मे ला ‘वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. आशिष देशमुख यांनी कोविडग्रस्तांची समर्पित भावनेने सेवा करणाऱ्या ‘कोविड देवदूतांचा’ मा.श्री. रणजीतबाबू देशमुख यांच्या हस्ते मातोश्री हॉल, लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर येथे सन्मानचिन्ह व मानधन देऊन सत्कार केला.

वैद्यकीय शिक्षक, निवासी डॉक्टर, निदान विभाग, नर्सिंग, प्रशासन, शिक्षकेतर कर्मचारी, बायोमेडीकल विभाग, इलेक्ट्रिक विभाग, सिव्हील विभाग, कार्यशाळा व ट्रान्सपोर्ट विभागातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देवदूतांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कैलाश देशभ्रतार (डेड बॉडी डिस्पोजल), आशा मांगे व संजय बनसोड (रुग्णांच्या वापरलेल्या कपड्यांची व्यवस्था/विल्हेवाट), हेमराज पाटील व अश्विन गोमकाळे (ऑक्सिजन पाईपलाईन व ऑक्सिजन व्यवस्था), कोमलता डोंगरे (नर्सिंग सेवा), जगदीश बोकुलकर व शंकर केदार (तातडीची अम्बुलंस सेवा) आणि अभिनव होले (व्हेंटीलेटर टेक्निकल मॅनेजमेंट) यांना विशेष कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. (१) ना-नफा संस्थांकडून कोविड संदर्भात समुदायाच्या सेवेसाठी विशिष्ट प्रतिसाद. (२) कोविड-१९ विषाणूचा सामना करण्यासाठी २०२० च्या सुरूवातीस वैद्यकीय नवकल्पना विकसित करणे. (३) सरकारी कर्मचारी ज्यांनी २०२० च्या सुरुवातीपासूनच कर्तव्यदक्ष राहून आम्हाला सुरक्षित राहण्यासाठी व माहिती देण्यासाठी कार्य केले. (४) कोविड-१९ विषाणूचा परिणाम कमी करण्यासाठी २०२० च्या सुरूवातीपासूनच ग्राहक सेवा विकसित केल्या. या ४ वर्गातील विदर्भ स्तरावरील देवदूतांचा सत्कार येत्या २-३ महिन्यात करण्यात येईल. त्यासाठी विदर्भ स्तरावरील आवेदने मागविण्यात आले आहेत.

“संपूर्ण देशात डॉक्टर्स, परिचारिका, अटेंडंट, स्विपर व रुग्णालयातील इतर कर्मचारी दिवस-रात्र एक करून कोविडग्रस्तांची सेवा करीत आहेत. लोकनेते रणजीतबाबू देशमुख अमृत महोत्सवाच्या निमित्याने कोविडग्रस्तांच्या सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘विदर्भातील समर्पित कोविड देवदूतांचा’ सन्मानचिन्ह व मानधन (देवदूत सन्मान) देऊन सन्मान करणे प्रेरणादायी आहे. या ‘देवदूतां’प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. स्वत:ची परवा न करता या देवदूतांनी कोविडग्रस्तांची सेवा केली. विविध विभागातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देवदूतांचे अभिनंदन. तिसऱ्या लहरीच्या संभावनेची भिती पाहता कोरोनाग्रस्त लहान मुलांसाठी व म्युकरमायकोसीसच्या रुग्णांसाठी सर्व सुविधांनी सुसज्जित आणखी ४० नवीन बेड्स उपलब्ध करून देत आहे. कोविडग्रस्त लहान मुलांना आणि म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना उत्कृष्ट उपचार सेवा प्रदान करण्यास लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूरची वैद्यकीय चमू तयार आहे. यापुढेसुद्धा कोरोनाग्रस्त रुग्णांना ही चमू उत्कृष्ट सेवा प्रदान करेल, असा विश्वास आहे”, असे प्रतिपादन डॉ. आशिष देशमुख यांनी यावेळी केले.

मा.श्री. रणजीतबाबू देशमुख यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिया. यावेळी सौ. रूपाताई देशमुख, डॉ. भाऊसाहेब भोगे, श्री. युवराज चालखोर, श्री. सुधीर देशमुख, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा, उप-अधिष्ठाता डॉ. विलास ठोंबरे, लता मंगेशकर हॉस्पीटलचे प्रशासकीय संचालक डॉ. विकास धानोरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन देवस्थळे उपस्थित होते. डॉ. सुरेश चारी, डॉ. मोहना मुजुमदार, डॉ. अॅनि विल्किन्सन, डॉ. सुशील गावंडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.