Published On : Mon, Jun 15th, 2020

रायगडमधील वीज यंत्रणेच्या दुरूस्तीची कामे युध्दस्तरावर प्रधान ऊर्जा सचिव श्री.दिनेश वाघमारे

Advertisement

मुंबई: अतितिव्र निसर्ग चक्री वादळामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वीज यंत्रणेचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. निसर्गाचे हे आव्हान महावितरणने स्वीकारून सर्व भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू असल्याचे राज्याचे प्रधान ऊर्जा सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

निसर्ग चक्री वादळ आल्यानंतर प्रधान ऊर्जा सचिव श्री. वाघमारे यांनी दुसऱ्यांदा भेट देऊन रायगड जिल्हयातील वीज यंत्रणेच्या दुरूस्तीच्या कामांची पाहणी केली. या भागातील सर्वच वर्गवारीतील ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित सुरळीत व्हावा, याकरिता आवश्यकतेनुसार व अतिरिक्त साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. परंतु, अत्यंत प्रतिकुल नैसर्गिक परिस्थिती व सध्या सुरू असलेल्या पावसामुळे दुरूस्तीच्या कामात काही ठिकाणी अडथळे येत आहेत.

कोणतीही नैसर्गिक परिस्थिती उद्भवल्यास त्याला नेहमीच सामोरे जाणाऱ्या महावितरणद्वारे रायगड जिल्हयातील सर्वच शहरी व ग्रामीण भागांतील ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित पूर्ववत करण्याचे युध्दस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे प्रधान ऊर्जा सचिव श्री. वाघमारे यांनी सांगितले.

प्रधान ऊर्जा सचिव व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.दिनेश वाघमारे यांनी अलिबाग येथील वादळामुळे कोसळलेल्या व पुन्हा उभारण्यात आलेल्या रेवदांडा फिडर्सची पाहणी केली.

पाबरे येथील अति उच्चदाब उपकेंद्रातून येणाऱ्या मुरूड इनकमर फिडर्स् तसेच म्हसळा ते श्रीवर्धन इनकमिंग फिडर्सच्या अत्यंत कठीण असलेल्या वीज यंत्रणेच्या दुरूस्तीच्या कामांची पाहणी केली. श्री. वाघमारे यांनी यावेळी प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी व श्री. सचिनदादा
धर्माधिकारी यांची भेट घेतली. या भागातील वीजपुरवठा त्वरित पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व एजंसीची मदत देण्यात येईल, असे श्री.धर्माधिकारी यांनी सांगितले.

यावेळी श्री.दिनेश वाघमारे यांच्यासोबत कोंकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री.गोविंद बोडके, संचालक (संचालन) श्री.दिनेशचंद्र साबू, महापारेषणचे संचालक (संचालन) श्री.संजय ताकसांडे, भांडुप परिमंडलाच्या मुख्य अभियंता श्रीमती पुष्पा चव्हाण, पेण मंडलाचे अधीक्षक अभियंता
श्री.दिपक पाटील व वाशी मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री. राजाराम माने व इतर अभियंते सहभागी झाले होते.