नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विदर्भ आणि मराठवाड्यातील उमेदवारांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. परीक्षेसाठी केवळ मुंबईवर अवलंबून राहण्याची वेळ आता उमेदवारांवर येणार नाही. आयोगाने परीक्षा केंद्रांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या चार शहरांमध्ये परीक्षा केंद्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
एमपीएससीकडून विविध जाहिरातींतर्गत प्राध्यापक स्तरावरील पदांच्या भरतीसाठी सुमारे ४२ विषयांच्या छाननी परीक्षा घेण्यात येणार आहेत. यापूर्वी या परीक्षांसाठी प्रामुख्याने मुंबईतच केंद्रे निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील उमेदवारांना अवघ्या काही वेळांच्या परीक्षेसाठी मोठा प्रवास करून मुंबई गाठावी लागत होती. त्यात प्रवासासोबतच राहण्याचा आणि भोजनाचा अतिरिक्त खर्चही उमेदवारांवर पडत होता.
विदर्भातील उमेदवारांना मोठा फायदा-
भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर यासह विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून मुंबईला जाणाऱ्या उमेदवारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात लांबचा प्रवास अधिक त्रासदायक ठरत होता. आता नागपूर आणि अमरावती येथे केंद्र उपलब्ध झाल्याने विदर्भातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर येथे केंद्र सुरू झाल्याने मराठवाड्यातील उमेदवारांचीही गैरसोय दूर होणार आहे.
६ जुलैला मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी-
परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या विद्यार्थी आघाडीकडून ६ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते. विद्यार्थी आघाडीचे संयोजक शांतनू झाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विदर्भ आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षा केंद्रे सुरू करण्याची मागणी केली होती. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन करारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनीही या मागणीसाठी पाठपुरावा केला.
प्रवासाचा खर्च आणि मानसिक ताण कमी होणार-
एमपीएससीच्या या निर्णयाचे परीक्षार्थींनी स्वागत केले आहे. जवळच्या शहरांमध्ये परीक्षा केंद्र उपलब्ध झाल्यामुळे उमेदवारांचा प्रवासाचा वेळ, आर्थिक खर्च आणि मानसिक ताण कमी होणार आहे. विशेषतः केवळ परीक्षेसाठी मुंबईपर्यंतचा मोठा प्रवास करावा लागणाऱ्या उमेदवारांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
परीक्षा केंद्रांचे विकेंद्रीकरण करण्याच्या या निर्णयामुळे एमपीएससीची परीक्षा व्यवस्था अधिक सुलभ आणि उमेदवारांसाठी सोयीची होणार आहे. आता विदर्भ आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या शहरात परीक्षा देता येणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.




