Published On : Fri, Nov 25th, 2022

नवीन वर्षात खासदार क्रीडा महोत्सवाची मेजवानी

Advertisement

उद्घाटन व समारोप समारंभात सादर होणाऱ्या प्रात्यक्षिकांसाठी विशेष स्पर्धा १९ डिसेंबरला

नागपूर : नागपूर शहरातील खेळाडूंसह असंख्य क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असणारा नागपूरच्या क्रीडा क्षेत्राचा उत्सव केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवाचे नव्या वर्षात आयोजन होत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन व समारोप समारंभामध्ये मान्यवर अतिथींपुढे सादर होणाऱ्या विविध प्रात्यक्षिकांसाठी विशेष स्पर्धा घेण्यात येत आहे. १९ डिसेंबर २०२२ रोजी महाल येथील चिटणीस पार्कवर ही स्पर्धा होणार असून विजेत्यांना आकर्षक रोख बक्षीसे प्रदान केली जाणार आहेत, अशी माहिती खासदार क्रीडा महोत्सव समितीचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी दिली.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन व समारोप समारंभामध्ये शहरातील विविध क्रीडा संघटना, शाळा, सामाजिक संस्थांकडून प्रात्यक्षिक सादर केले जातात. मात्र आता या प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणासाठी खासदार क्रीडा महोत्सवापूर्वी एक विशेष स्पर्धा घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे, विविध प्रकारच्या प्रात्यक्षिक स्पर्धेत विजयी झालेल्या चमूंचे प्रात्यक्षिक आगामी काळात होणाऱ्या पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन आणि समारोप समारंभात होईल.

१. लेझीम, २. ॲरोबिक्स, ३. झुम्बा, ४. लोकनृत्य (फोक डान्स) – गोंधळ, कथ्थक, आदिवासी नृत्य आदी पारंपरिक नृत्य, ५. मल्लखांब, रोप मल्लखांब सामुहिक, ६. मानवी मनोरे (कवायत), ७. शारीरिक कवायत, ८. सामुहिक दंड शस्त्र प्रदर्शन, ९. सामुहिक बँड पथक/घोष पथक प्रात्याक्षिक, १०. ग्रुप डान्स, ११. ढोलताशा पथक

उपरोक्त ११ प्रकारच्या प्रात्यक्षिकांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी काही नियम व अटी निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त कुठल्याही प्रकारात सहभागी स्पर्धेत विद्यार्थी संख्या कमीत कमी १०० पेक्षा कमी नसावी. स्पर्धेमध्ये कुठलीही शाळा, विद्यालय, महाविद्यालय, मंडळ, सामाजिक संस्था, डान्स क्लास/क्लब सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी १४ डिसेंबर २०२२ पर्यंत आपले प्रवेश निश्चित करावे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी डॉ. हंबीरराव मोहिते (९४२२४७७०२६), प्रदीप केचे (९४२२१२३००१), महेंद्र आरेवार (९८५०३२१२९४), पंकज करपे (९०२१३६१९०३), पराग पाठक (७४४७७६५३५६), डॉ. अंकुश घाटे (९७६६८४८०५७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सव समितीचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.

५१ हजाराचे प्रथम बक्षीस
प्रात्यक्षिक स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघाला ५१ हजार रूपये रोख तर द्वितीय क्रमांकाला ३१ हजार आणि तिसऱ्या क्रमांकासाठी २१ हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. याशिवाय ५ संघांना प्रत्येकी ५ हजार रुपये रोख उत्तेजनार्थ पुरस्कार सुद्धा दिले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि संघाला सन्मान चिन्ह देण्यात येईल.

स्पर्धेसंदर्भात महत्वाची सूचना
– स्पर्धकांना स्पर्धास्थळी आणण्याची सर्व जबाबदारी सहभागी संस्थेची राहिल.

– सर्व प्रात्यक्षिकाचे सादरीकरण ५ मिनिटापर्यंत मर्यादित असावे.

– या स्पर्धेत सहभागी शाळा / महाविद्यालय / क्लब यांच्या पैकी उत्कृष्ठ चमूची निवड करून त्यांनाच खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन व समारोप कार्यक्रमात प्रात्याक्षिक सादर करण्याचा अंतीम निर्णय हा खासदार क्रीडा महोत्सव समितीचा राहिल.