Published On : Fri, Nov 25th, 2022

महालातील मनपाचे बुधवार बाजार खाली करण्याची कारवाई

Advertisement

३५६ दुकाने हटविली : नऊ मजली वाणिज्यिक संकुल बनणार

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या मालकीचे महाल येथील बुधवार बाजाराच्या जागेवर असलेल्या ३५६ परवानाधारकांवर कारवाई करीत त्यांचे दुकाने/ओटे/जागा रिकामी करण्यात आली आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी (ता.२५) उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम, उपायुक्त (बाजार) रवींद्र भलावे आणि उपायुक्त (अतिक्रमण) अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त गणेश राठोड, बाजार अधीक्षक प्रमोद वानखेडे, सहायक अधीक्षक कल्याण खोब्रागडे आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेच्या बुधवार बाजार महाल येथील जागेवर ननीन नऊ मजली वाणिज्यिक संकूल बांधण्याचा निर्णय मनपा सभागृहाने घेतलेला आहे. बुधवार बाजार महाल मधील मनपा बाजार विभागाच्या परवान्यावर दुकान/ओटा/जागा वापरत असलेल्या ३५६ परवानाधारकांकडून उक्त दुकान/ ओटा/जागा रिकामे करून घेणेबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम च्या तरतूदी अंतर्गत कार्यवाही च्या अनुषंगाने सर्व परवानेधारकाना नोटीस तामील करण्यात आले होते. यासोबतच नोटीस तामील झाल्याच्या दिनांक पासून एक महिन्याच्या आत दुकान / ओटा/ जागा खाली करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले होते.

परंतू एक महिन्याचा कालावधी संपुष्ठात आल्यानंतरही परवानाधारकांकडून दुकान/ ओटे/जागा खाली करण्यात आली नाही. त्यामुळे शुक्रवारी (ता.२५) पोलिस बंदोबस्तात सकाळी ११ वाजतापासून अतिक्रमण विभागाच्या तीन चमूद्वारे बाजार खाली करण्याची कारवाई करण्यात आली.