नागपूर : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात हालचालींना सुरुवात होत आहे. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी आता येत्या २३ जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात होणार असल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सर्वेक्षणासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांसह महानगरपालिका, नगरपालिकांतील कर्मचाऱ्यांना शनिवारपासून दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर थेट सर्वेक्षणाला सुरूवात होणार असून हे सर्वेक्षण येत्या ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारने १३ नोव्हेंबर २०२३ रोजी पाठविलेल्या पत्रानुसार मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविले आहे. त्या अनुषंगाने राज्यभरातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येईल. याकरिता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरिता स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून त्याचे प्रशिक्षण हे गोखले इन्स्टिट्यूटकडील मास्टर ट्रेनर अर्थात प्रशिक्षक २० जानेवारीपासून जिल्ह्याच्या अथवा महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित राहतील. हे प्रशिक्षक तालुकापातळीवरील प्रशिक्षणास मदत करतील.
जिल्ह्याच्या अथवा महानगरपालिकेच्या मुख्यालयात तालुक्याच्या व वॉर्डस्तरीय सर्व प्रशिक्षकांना सॉफ्टवेअर वापराचे शनिवारपासून प्रशिक्षक प्रशिक्षण देतील. वॉर्ड व तालुक्याचे प्रशिक्षक २१ आणि २२ जानेवारीला संबंधित तालुक्याच्या किंवा वॉर्डाच्या ठिकाणी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील. तसेच २३ जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात येणार असून येत्या ३१ जानेवारीपूर्वी सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे, असे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य सचिव आशा पाटील यांनी सांगितले.