नागपूर: भारतासारख्या बहुभाषिक देशात एकापेक्षा अधिक भाषा सहज बोलल्या जातात. यामुळे आपल्या भाषेविषयी कुठलाही न्यूनगंड न बाळगता दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा जास्तीत-जास्त वापर करावा. निर्विवादपणे अभिव्यक्तीसाठी मातृभाषा प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती शैलजा वाघ-दांदळे यांनी केले.
विभागीय शासकीय ग्रंथालय येथे आज मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला वरिष्ठ ग्रंथपाल श्रीमती वि. मु. डांगे, जिल्हा माहिती अधिकारी (विशेष कार्य) अनिल गडेकर, श्रीमती अपर्णा डांगोरे- यावलकर तसेच शासकीय ग्रंथालयातील अधिकारी, कर्मचारी वाचक उपस्थित होते.
व्यावहारिक यशाशी इंग्रजीचे नाते जोडले गेले आहे, त्याचा परिणाम जाणवत असला तरी आपण आपल्याच भाषेला कमी लेखून न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही, असे सांगून श्रीमती वाघ म्हणाल्या की, माणूस मातृभाषा सहज आत्मसात करतो आणि त्याच्या विचाराची तीच भाषा असते, हे लक्षात घेता शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतले जाणे गरजेचे आहे. वाचनाने भाषा आणि अभिव्यक्ती सोपी होते, हे लक्षात घ्यावे. भाषा हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे. कुठलीही भाषा ही श्रेष्ठ -कनिष्ठ नसते. प्रत्येक प्रदेशात भाषेमध्ये बदल दिसून येतो. मातृभाषेला समृद्ध करण्यासाठी सर्वसामान्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
श्री. गडेकर म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषाप्रेमी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहे. आपली भाषा आपला स्वाभीमान आहे. म्हणून प्रत्येकाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्वत:पासून सुरुवात करण्याचा संकल्प मराठी दिनी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्रीमती वि. मु. डांगे म्हणाल्या, प्रत्येक बारा कोसावर मराठी भाषेमध्ये बदल झालेला दिसतो. आपल्या मातृभाषेचा सन्मान होणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सतत कार्यरत राहिले पाहिजे. यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी कुसुमाग्रजांच्या निवडक पुस्तकांचे वाचकांसाठी ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. वाचकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी तांत्रिक सहाय्यक रं. वा. शेंडे, श्रीमती शोभा मासुरकर, कनिष्ठ लिपिक तुषार राखडे, संतोष वाघाडे, श्री. गणवीर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
Attachments area