Published On : Sun, May 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पोलिस दलातील ‘मदर पॉवर’; आईच्या पावलावर पाऊल टाकत तिन्ही लेकी झाल्या पोलीस!

... आरती आणि वंशिका सोबत रविकांत कांबळे
Advertisement

नागपूर – काही नाती रक्ताची असतात… तर काही प्रेरणेची.पण जेव्हा दोन्ही एका व्यक्तीत मिळतात… तेव्हा तिला ‘आई’ म्हणतात.

मदर्स डेच्या निमित्ताने नागपूर पोलिस दलातील अशीच एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे, जिथे एका आईने स्वतः पोलीस दलात सेवा बजावत आपल्या तिन्ही मुलींनाही त्याच मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली.

कुसुम हेडाऊ… नागपूर पोलिस विभागातील एक कर्तव्यदक्ष महिला पोलीस कर्मचारी. 2020 मध्ये त्या सेवेतून निवृत्त झाल्या. पण गणवेशातील त्यांची शिस्त, जिद्द आणि कामाप्रती असलेलं समर्पण आजही त्यांच्या मुलींच्या कामातून दिसून येतं.

आज त्यांच्या तिन्ही मुली नागपूर पोलिस दलात वूमन हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.

Advertisement

गौरी वसुदेव हेडाऊ (कपिल नगर पोलीस स्टेशन)
दीपमाला वसुदेव हेडाऊ (पोलीस मुख्यालय)
प्रियांका वसुदेव हेडाऊ (जरीपटका पोलीस स्टेशन)
आईच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी केवळ नोकरी स्वीकारली नाही, तर आईने दिलेले संस्कार आणि कर्तव्याची शिकवणही जपली.

गौरी हेडाऊ सांगतात,लहानपणी आईला गणवेशात पाहायचो, तिचं काम पाहायचो. त्या वेळीच मनात ठरलं होतं की आपल्यालाही पोलीस बनायचं. आम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी आईने खूप मेहनत घेतली. ती नसती तर आम्ही इथे नसतो.

घरात आई… आणि बाहेर वरिष्ठ अधिकारी… या दोन भूमिका कुसुम हेडाऊ यांनी तितक्याच ताकदीने निभावल्या. शिस्तीबाबत कुठलीही तडजोड नाही, हे त्यांनी मुलींना लहानपणापासून शिकवलं.

दीपमाला हेडाऊ म्हणतात,
“आईने आम्हाला पोलिस विभागात येण्यासाठी सतत प्रोत्साहन दिलं. ती आमच्यासाठी फक्त आई नव्हती, तर ट्रेनर होती. पोलीस भरतीपासून ते शिस्तीपर्यंत प्रत्येक गोष्ट ती स्वतः शिकवत होती.”

तर प्रियांका हेडाऊ यांच्या शब्दांत आईबद्दलचा अभिमान स्पष्ट जाणवतो.

आज आम्ही तिघीही आई आहोत. आमच्या आईने जे संस्कार दिले, तेच आम्ही आमच्या मुलांना देत आहोत. जिद्द, चिकाटी आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद आईनेच दिली.

एका आईने स्वतःच्या संघर्षातून उभं राहून मुलींना स्वप्न दाखवलं… आणि त्या स्वप्नांना गणवेशाचं रूपही दिलं.
आज कुसुम हेडाऊ यांच्यासाठी हा फक्त अभिमानाचा क्षण नाही, तर त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाचं खरं यश आहे.’मदर्स डे’च्या निमित्ताने ही कहाणी अनेक महिलांसाठी प्रेरणा देणारी ठरत आहे. कारण आई फक्त जन्म देत नाही… तर ती स्वप्नांनाही आकार देते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.