Published On : Thu, Nov 7th, 2019

चांगली वैद्यकीय महाविद्यालय देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थापन होणे गरजेचे

Advertisement

नागपूर : देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता या सारख्या महानगराप्रमाणेच चांगली वैद्यकीय महाविद्यालये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थापन झाली पाहिजे ज्यामूळे गरीब रुग्णांना त्वरित व किफायतशीर वैद्यकीय सेवा मिळेल, अशी आशा केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केली. असोसिएशन ऑफ मिनीमल एक्सेस सर्जन्स ऑफ इंडिया यांच्याद्वारे नागपुरातील सुरेश भट सभागृहात आयोजीत ‘अॅमिस्कॉन 2019 ’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज यांच्या हस्ते झाले , त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ . प्रकाश आमटे, परिषदेचे संयोजक डॉ. प्रशांत रहाटे, संयोजन अध्यक्ष डॉ. गोडे, अॅमिस्कॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पली वेलू उपस्थित होते.

वैद्यकीय क्षेत्रातील खाजगी क्षेत्राचे महत्व अधोरेखित करतांना गडकरी म्हणाले की, खाजगी क्षेत्राला सुद्धा वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली असून यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढतील व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या रोजगारामध्ये वाढ होईल. भारतातील डॉक्टरांची ख्याती ही जगभर पसरली असून इंग्लंड तसेच अमेरिकेत सुद्धा त्यांना चांगली मागणी आहे, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात बाबा आमटे व त्यांच्या कुटुंबीयांनी समाजसेवेचे व्रत चालू केले होते तेच पुढे डॉ. प्रकाश आमटे यांनी आपल्या समाजकार्यातून पुढे नेले असे सांगून गडकरींनी आमटे दाम्पत्यांच्या कार्यकर्तूत्वाची प्रशंसा केली. याप्रसंगी डॉ. प्रकाश आमटे यांना गडकरींच्या हस्ते अॅमासी (असोसिएशन ऑफ मिनीमल एक्सेस सर्जन्स ऑफ इंडिया) ही फेलोशीप प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

भारतीय शल्यचिकित्सकेची परंपरा ही पाच हजार वर्ष जूनी असून प्राचीन वैद्यकशास्त्राची दखल जागतिक पातळीवर घेतली जात असल्याच अॅमिस्कॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पली वेलू यांनी यावेळी सांगितले.

या परिषदेदरम्यान सुमारे 60 रुग्णांची शस्त्रक्रिया ही सूक्ष्म दुर्बिण , रोबोटिक्स आणि लेझर तंत्रज्ञानाद्वारे डॉ. प्रशांत रहाटे यांच्या सेवन स्टार हॉस्पिटल नंदनवन येथे होत असून त्याचे प्रत्यक्ष चित्रीकरण हे सुरेश भट येथील सभागृहातील दालनांमध्ये उपस्थित प्रतिनिधी व प्रेक्षकांना दिसत आहे.

या परिषदेदरम्यान पॅरामेडिकल स्टाफ आणि सूक्ष्म दुर्बीण शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जन यांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. शल्य चिकित्सकांना त्यांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी या परिषदेप्रसंगी आयोजित दीक्षांत समारंभात मान्यवरांच्या हस्ते फेलोशीप देऊन गौरविण्यात आले.

या परिषदेत देशविदेशातील चिकित्सक, वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच पॅरामेडीकल क्षेत्रातील सुमारे पंधराशे प्रतिनिधींचा सहभाग नोंदविला गेला आहे.परिषदेचा समारोप 10 नोव्हेंबर रोजी होईल.