Published On : Mon, Sep 21st, 2020

नागपुरात मान्सून पुन्हा सक्रिय, ४७.९ मिमी पाऊस

नागपूर : बंगालच्या खोऱ्यात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून नागपूरसह विदर्भातील अनेक भागात गेल्या २४ तासात पाऊस झाला. नागपुरात शनिवारी रात्री पावसाच्या सरी पडल्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा मुसळधार पाऊस पडला. रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत नागपुरात २.५ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली तर सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ४५.४ मिमी इतका पाऊस झाला. म्हणजेच गेल्या २४ तासात नागपुरात ४७.९ मिमी इतका पाऊस झाला.

हवामान विभागानुसार बंगालच्या खोऱ्यात तयार झालेल्या कमी दाबामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, ओरिसा व केरळसह मध्य भारतातील अनेक भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. अधून-मधून पाऊस होत राहील. यावर्षी नागपुरात जूनपासूनच मान्सून सक्रिय झाला होता. मध्यम व कमी गतीने पाऊस सातत्याने सुरु होता. परिणामी १ जून पासून २० सप्टेंबरपर्यंत नागपुरात एकूण ११९८.६ मिमी इतका पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा ४ टक्के अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस होत नाही. तरीही मान्सून परत आल्याने दोन ते तीन दिवस चांगला पाऊस होऊ शकतो. नागपुरात गेल्या २४ तासात अधूनमधून पाऊस सुरू आहे. त्यामुळे कमाल तापमान १.६ डिग्रीने खाली घसरून ३३.७ डिग्री सेल्सियसवर पोहोचले आहे. तर किमान तापमानही १.१ डिग्रीने खली घसरून २३.२ डिग्री सेल्सिअसवर आले

विदर्भाची स्थिती नाजूक
विदर्भात नागपूरशिवाय बुलडाणा येथे सरासरी ३ तर वाशिममध्ये सरासरी ११ टक्के अधिक पाऊस झाला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. अमरावतीमध्ये सरासरीपेक्षा २१ टक्के, अकोला २७, यवतमाळ २५, चंद्रपूर १८, गडचिरोली १०, वर्धा ११, गोंदिया ८ आणि भंडारामध्ये ४ टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात १ जूनपासून २० सप्टेंबर दरम्यान ८०३.२ मिमी इतका पाऊस झाला. तो सरासरीपेक्षा ११ टक्के कमी आहे. याच काालावधीत विदर्भात सरासरी ८०५.४ मिमी इतका पाऊस होतो. यावेळी मराठवाड्यात सरासरीपेक्षा २८ टक्के, मध्य महाराष्ट्रात ३२ टक्के आणि कोकणात २५ टक्के अधिक पाऊस झाला.