Published On : Mon, Jun 25th, 2018

पावसाच्या दडीमुळे विदर्भ दुबार संकटात!

नागपूर: दरवर्षीप्रमाणे पेरणीसाठी पावसाची वाट पाहणारे शेतकरी यावर्षीही आतुरतेने वाट बघत असतांना मृगाच्या पहिल्याच दिवशी पावसाने विदर्भात जोरदार हजेरी लावली. मात्र त्यानंतर पावसाने विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात मागील दोन आठवड्यापासून दडी मारली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. मृगारंभी बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांची आशा पल्लवित झाली होती, आता मात्र निराशेचे गडद दगड दाटले आहेत. या नैराश्यामुळे ऐन हंगामात शेतकरी आत्महत्या करीत असतानाच अंकुरलेल्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवले जात आहेत. या आठवड्यात पाऊस येईल असा अंदाज आहे व हा अंदाज खरा ठरावा अशी विनवणी केली जात आहे.

यंदा पाऊस चांगला पडेल, असा अंदाज वर्तविला गेला होता. मान्सूनचे मृगाच्या दिवशी आगमन हा गेल्या काही वर्षात अपवाद ठरतो आहे. यंदा मात्र हा योग साधला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विस्मयकारक आनंद पसरला. ७, ८ आणि ९ जून रोजी पावसाने दमदार हजेरी लावली असता शेतकऱ्यांचा विश्वास दुणावला व पेरणीच्या कामाला वेग आला. पहिल्या टप्प्यात सोयाबीन, कापसाच्या बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहेत. अमरावती विभागात मागील शुक्रवारपर्यंत २६ टक्के पेरण्या झाल्या. पश्चिम विदर्भातील वाशिमसारख्या जिल्ह्यात पाऊस चांगला पडल्याने पेरा बऱ्यापैकी वाढल्या आहेत, तरीही एकूण स्थिती समाधानकारक नाही. पावसाची दडी कायम राहील ही धाकधूक शेतकऱ्यांना अस्वस्थ करीत आहे. कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार, विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात या महिण्यात सर्वात कमी पाऊस आला आहे, तर सर्वाधिक पावसाची नोंद वाशीम जिल्ह्यात करण्यात आली आहे.

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील वडद येथील ३० शेतकऱ्यांनी पावसाच्या अभावामुळे पेरणी उलटली म्हणून उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. तसेच सेवाग्राम परिसरातील तीन गावातही ट्रॅक्टर फिरवण्यात आले. साधारणतः २५ जूनपर्यंत खरिपाची पेरणी पूर्ण होणे अपेक्षित असते, हे वेळापत्रक मात्र कोलमडले आहे. मृगारंभाच्या पावसाने जमिनीत ओलावा निर्माण झाला असता धानाला लगेच अंकुर फुटले. पण आता हे अंकुर मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. आज, सोमवारपासून पुढचे पाच दिवस पावसाचे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.