Published On : Thu, Mar 30th, 2017

मनपातर्फे ३१ ला ‘दोन रेघी वही’ सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत एकांकिका

Advertisement

नागपूर: महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘दोन रेघी वही- एक प्रवास शिक्षणाकडे’ या एकांकिकेचे सादरीकरण शुक्रवार ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हील लाईन्स येथे होणार आहे.

‘वाईट, चुकीचा दृष्टीकोन हेच जीवनातील अपंगत्व आहे’ हा उदात्त विचार सांगणारी ही सर्वशिक्षा अभियान समावेशित शिक्षणाची राज्यातील पहिलीच एकांकिका आहे. एकांकिकेची निर्मिती नागपूर महानगरपालिकेची असून महापौर नंदा जिचकार व आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संकल्पना अभिजित राऊत यांची असून दिग्दर्शन चैतन्य दुबे यांनी केले आहे. प्रियंका नंदनवार लिखित या एकांकिकेला निर्मिती सहयोग कलाविष्कार मल्टीमीडिया यांनी केली आहे.

मनपाच्या शाळांतील शिक्षक हे मागील दहा वर्षांपसून मनपा शाळेतील विशेष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचे कार्य करीत आहे. एकांकिकेत विशेष मुलांचादेखिल अभिनय बघायला मिळणार आहे. कलाक्षेत्रात मनपाचे विद्यार्थीही कुठेच कमी नाही हेच ही एकांकिका हे सिद्ध करते. आजपर्यंत मनपा तसेच खाजगी शाळा मिळून २९० शाळांमधून १७१० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य मनपाच्या कर्मचारी वर्गाने केले आहे. या एकांकिकेला रसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते संजय महाकाळकर, शिक्षण सभापती दिलीप दिवे, अप्पर आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी फारुख अहमद यांनी केले. प्रवेश नि:शुल्क असून अधिक महितीकरिता ७०३०९३१७७६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सत्कार सोहळा
महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे एकांकिकेच्या सादरीकरणानंतर सामान्य शाळेत शिक्षण घेत विशेष यश संपादन केलेल्या 16 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. सोबतच दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी परीश्रम घेणा-या 16 मुख्याध्यापक व शिक्षक, 2 विशेष शिक्षक आणि 3 विषय तज्ज्ञांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल.